
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजतगाजत ठाण्यात सुरू केलेल्या आपला दवाखाना योजनेला महापालिकेनेच टाळे ठोकले आहे. ठेकेदाराची मुदत संपल्याचे कारण देत शहरातील आपला दवाखाना बंद करण्यात आला असून नागरिकांची आरोग्य व्यवस्था मात्र वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे. कंत्राट संपले असले तरी ते वाढवले का नाही, असा थेट सवाल ठाणेकरांनी केला असून प्रशासनाने मात्र हात झटकले आहेत.
झोपडपट्टी परिसरातील गोरगरीबांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी ठाणे महापालिकेने ३१ जुलै २०२० रोजी कायदिश देऊन आपला दवाखाना ही योजना सुरू केली. गरीब रुग्णांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. त्याचा ठेका मे. मेड ऑन गो हेल्थ प्रा. ली. या कंपनीला देण्यात आला. या कंपनीने ५० दवाखाने सुरू करणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात ४६ दवाखाने सुरू केले. मात्र कंपनीचे कंत्राट संपल्याचे सांगून पालिकेने आपला दवाखाना बंद केल्याने गोरगरीब रुग्णांची आरोग्य व्यवस्थाच सलाईनवर गेली आहे.
प्रशासनाची हात की सफाई
आपला दवाखाना ही योजना बंद झाली असली तरी केंद्र सरकारच्या नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या योजनेंतर्गत ४३ दवाखाने ठाण्यात सुरू असल्याचे आरोग्य उपायुक्त उमेश बिरारी यांनी सांगितले. पण ठाणेकरांना पाच वर्षे सेवा देणारा आपला दवाखाना बंद का केला याचे ठोस उत्तर न देता प्रशासनाने हात की सफाई केली आहे.
भाडे थकवले…साड्यांचे दुकान थाटले
आपला दवाखाना ज्या जागांमध्ये सुरू करण्यात आला होता त्यापैकी काही जागांचे भाडे ठेकेदाराने थकवले होते. भाड्यासह पाणी, वीज, इंटरनेट कनेक्शन याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावरच होती, असे पालिकेने म्हटले आहे. दवाखाने बंद झाल्याने अखेर जागामाल कांनी व्यावसायिकांना गाळे भाड्याने दिले असून काही ठिकाणी तर या दवाखान्यांमध्ये साड्यांचे दुकानच थाटले आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे पगार बँक गॅरेंटीतून देणार
आपला दवाखाना बंद झाल्याने भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आंदोल नाचा इशारा दिला होता. तसेच विरोधकांनीदेखील टीकेची झोड उठवली. संबंधित कंत्राटदाराने डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारदेखील रखडवले होते. आज ठाणे पालि केच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पगार पावणेतीन कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीतून देणार असल्याचे जाहीर केले. तसेच आदेशच आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.





























































