
मेट्रोचे संथ गतीने सुरू असलेले काम, ठिकठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे व अवजड वाहनांची घुसखोरी यामुळे घोडबंदरवासीय आधीच मेटाकुटीला आले आहेत. आर्धा किलोमीटर रस्ता ओलांडण्यासाठी प्रवाशांना तब्बल दीड ते दोन तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागते. याबाबत संताप व्यक्त होत असतानाच आता महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गायमुख घाटात पुन्हा दुरुस्तीचा घाट घातला आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवर प्रचंड ट्रॅफिक जाम होणार असून ठाणेकरांच्या डोसक्याचा ताप वाढणार आहे.
गायमुख घाटातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने मीरा-भाईंदर पालिकेकडून पंधरा दिवसांपूर्वीच त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. इंडियन ऑईल पेट्रोल पंप ते नीरा केंद्रापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांची वाहतूक चार दिवसांसाठी बंद केली होती. तसेच ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूच्या हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावर झालेल्या वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला होता. मात्र या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पंधरा दिवस उलटत नाही तोच ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा या गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने घोडबंदरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.
गायमुख घाटातील ५०० ते ६०० मीटर रस्त्याची वाट लागली आहे. हा रस्ता ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असल्याने महापालिका आणि सार्वजनिक विभागाने संयुक्तपणे या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पुढील महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून या कामाच्या नियोजनासाठी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासोबत महापालिका अधिकारी, वाहतूक शाखा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतुकीत बदल करणार
काही दिवसांपूर्वीच गायमुख घाटात मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. आता ठाणे महापालिकेकडून हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल केले जातील. त्याबाबत समाज माध्यमांवर जनजागृती केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली.





























































