
जव्हारमधील आदिवासी संस्कृतीचा आत्मा जिवंत करणारा ‘काठ्या-द मेसेंजर’ हा हृदयस्पर्शी माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. मोरया ग्रुप, कोगदे यांच्या वतीने आयोजित या प्रीमियर शोला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुफान गर्दी केली. ‘घराघरात संस्कृती, घराघरात अभिमान’ हा संदेश देणाऱ्या या माहितीपटाद्वारे आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, पारंपरिक ज्ञान आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवण्यात आले आहे.
‘काठ्या-द मेसेंजर’ या माहितीपटाची निर्मिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांनी केली आहे. या उपक्रमास हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या माहितीपटाचे पोस्टर ‘चिरकाल निर्वाणाचं ठाणं’ या शीर्षकाखाली नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या माहितीपटाचे लेखन व दिग्दर्शन संतोष बांबरे यांनी केले असून, छायाचित्रणाची जबाबदारी युवराज आशान आणि रुपेश आशान यांनी समर्थपणे पार पाडली आहे.
या चित्रपटाची निर्मिती आदीदीप प्रॉडक्शन्सची असून निर्माता म्हणून डॉ. दीपक चौधरी यांनी काम केले आहे. कोगदे ग्रामपंचायत परिसरात झालेल्या या भव्य कार्यक्रमात प्रेक्षकांनी ‘काठ्या-द मेसेंजर’ मधील प्रत्येक दृश्यातून आदिवासी समाजाचा जिवंत स्पंदन अनुभवला.





























































