शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही! मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो हेक्टर शेतजमिनीवरील पिक उद्ध्वस्त झाले. यामुळे शेतकरी हवालदील झाला. दिवाळीच्या आधी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. पण ही घोषणा कागदावरच राहिली. दिवाळीत शेतकऱ्यांना मदत पोहोचलीच नाही, हे खुद्द सरकारमधील एका मंत्र्यानेचे म्हटले. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हे पडसाद उमटले. या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावरून मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिवृष्टीसाठी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, मंत्र्यांनी दाखवला आरसा; वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

मंत्रिमंडळ बैठकीत मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून प्रश्न उपस्थित केला. अधिकारी म्हणतात सरकारकडून देण्यात आलेली मदत पोहोचली. जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली. पण शेतकरी म्हणतात मदत पोहोचलीच नाही, असा आरोप मकरंद पाटील यांनी केला. मात्र, आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. अखेर मुख्यमंत्र्यांनी या वादात मध्यस्थी केली. आजच आतापर्यंत झालेल्या मदतीबाबत आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली यासंदर्भात माहिती द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.