निवडणूक आयोगाच्या कृपेने सत्तेत आलेलं हे जनतेचं नाही, बिल्डर कंत्राटदारांचं सरकार आहे – आदित्य ठाकरे

“निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेलं महाराष्ट्रातलं सरकार अल्पावधीतच बिल्डर-कंत्राटदारांचं सरकार झालंय”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

पुण्यातल्या लोकमान्य नगरचंच उदाहरण देत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “पुण्यातल्या लोकमान्य नगरच्या पुर्नविकासाचा मार्ग स्थानिक रहिवाशांनी निवडला असताना आणि त्यांना तो विकास हवा असतानाही, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने बो पुर्नविकासाला स्थगिती दिली. झटक्यात असं करण्याचं कारण काय होतं?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आता ‘क्लस्टर विकासाच्या नावाखाली ही जागा सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या एका बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरु झालाय का? स्थानिकांचं काय म्हणणं आहे, हे ऐकून न घेता जर मुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील तर, सरकार नेमकं कोणाचं आहे? सरकार हे जनतेचं आहे की बिल्डर्सचं?”

ते पुढे म्हणाले, “दुसरीकडे पुण्यातले बहुतांश रस्ते आता ऑप्टिक फायबर्स टाकण्यासाठी खोदले जाणार आहेत, असं कळतंय. पण प्रश्न असा आहे की, एकीकडे पुणेकरांना याचा त्रास होणार असताना, कंत्राटदाराकडून रस्ते खोदाईसाठी जो मोबदला मनपा कडून घेतला जातो, तो घेतला जाणार आहे का? की तो सरकारचा लाडका कंत्राटदार असल्याने त्याला सूट दिली जाणार? हे जनतेचं नाही, बिल्डर कंत्राटदारांचंच सरकार आहे.”