
प्रतीका रावलच्या दुखापतीने हिंदुस्थानी महिला संघाला मोठा धक्का बसला असला तरी तिच्या जागी आलेली शफाली वर्मा ही संधी देवाची कृपा मानते. अधिकृत राखीव यादीत नाव नसतानाही ती थेट विश्वचषक उपांत्य फेरीच्या संघात सामील झाली आहे. बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या गट-सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतीकाच्या टाचेला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आणि ती स्पर्धेबाहेर गेली. त्यावेळी शेफाली सुरतमध्ये हरयाणाची कर्णधार म्हणून राष्ट्रीय टी-20 स्पर्धा खेळत होती. तिला जेव्हा मुंबईतून फोन आला, तेव्हा ती म्हणाली, ‘प्रतीकाबरोबर जे झालं ते दुर्दैवी आहे, पण ईश्वराने मला काहीतरी चांगलं घडवण्यासाठी पाठवलं आहे.’
या 21 वर्षांच्या आक्रमक आघाडीच्या फलंदाजाने अलीकडेच हरयाणासाठी 24 चेंडूंत 55 धावांची झंझावाती खेळी केली होती. हिंदुस्थान ‘ए’ च्या ऑस्ट्रेलिया दौऱयातही तिचा बॅटमधून फॉर्म तसाच होता. शफाली पुढे म्हणाली, मी अलीकडे राष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत होते. सेमीफायनल ही माझ्यासाठी नवी गोष्ट नाही. मी आधीही मोठय़ा सामन्यांचा दडपण अनुभवला आहे. आता फक्त मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वास राखणं महत्त्वाचं आहे. तिने पुढे सांगितले की, 50 षटकांचा फॉरमॅट तिच्यासाठी टी-20 इतका सोपा नाही, पण ती त्या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी सरावात बचावात्मक आणि आक्रमक दोन्ही प्रकारच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आहे.






























































