
आपला दवाखाना बंद झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने शहरात ४३ आरोग्य मंदिरे सुरू असल्याचा दावा आयुक्त सौरभ राव यांनी केला. मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी हा दावा फोल ठरवला आहे. कोपरीतील तीन आरोग्य मंदिरे उद्घाटन झाल्यानंतर लगेच बंद झाल्याचा पर्दाफाशही त्यांनी केला आहे. महापालिकेच्या या बनवाबनवीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशाराही भाजपने दिला आहे.
महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार उपायुक्त उमेश बिरारी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ४३ आरोग्य मंदिरे सुरू असल्याची माहिती दिली होती. आज आमदार संजय केळकर यांनी प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी कोपरी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता धक्कादायक वास्तव दिसून आले. येथील तीन आरोग्य मंदिरे बंद होती, तर आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होती. ठाणे पूर्वेतील मीठबंदर रोड, धोबी घाट व बारा बंगला परिसरातील ही आरोग्य मंदिरे असून ती अद्याप बंदच आहेत असे केळकर यांनी सांगितले.
प्रसूतीगृहाचा एनआयसीयू बंद
ठाण्यातील दोन मजली प्रसूतीगृहातील दुसऱ्या मजल्यावरील एनआयसीयू विभागात नवजात बालकांची विशेष काळजी घेण्यासाठी २० इन्क्युबेटर ठेवण्यात आले आहेत. मात्र उद्घाटनानंतर सहा महिने उलटूनही हा विभाग सुरू करण्यात आला नसल्याची माहिती केळकर यांनी दिली.
फितीही
लोंबकळलेल्या अवस्थेत
आरोग्य मंदिरे बंद असणे ही ठाणेकरांची घोर फसवणूक असून लोकप्रतिनिधींनादेखील प्रशासनाने खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे पालिकेविरोधात ल वकरच मोठे आंदोलन छेडू असा इशारा केळकर यांनी दिला आहे. दरम्यान, कोपरीतील ज्या तीन आरोग्य मंदिरांना त्यांनी भेट दिली तेथील उद्घाटनावेळच्या फितीदेखील लोंबकळत असल्याचे विदारक चित्र दिसत होते.



























































