
हिंगोलीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मिंध्यांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. हिंगोलीतील अवैध धंदे कुणाचे आहेत हे जगजाहीर आहे. या अवैध धंद्यांच्या विरोधात भाजपने दंड थोपटले आहेत. अवैध धंदे बंद करण्यासाठी भाजपने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. गृहखाते खुद्द देवाभाऊंकडे असतानाही हिंगोलीत अवैध धंदे बंद करण्यासाठी भाजपला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. भाजपने निवेदन देताच किल्ली दिलेल्या खेळण्याप्रमाणे पोलीस कामाला लागले आहेत!
हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे अनेक वर्षांपासून राजरोस चालू आहेत. हे धंदे कोणाच्या छत्रछायेखाली चालतात, कोण गॉडफादर आहे हे हिंगोलीकरांना माहिती आहे. या अवैध धंद्यांमुळे हिंगोलीतील तरुणांची पिढी बरबाद झाली. परंतु गुलामी आणि चाटूगिरीच्या धुंदीत असलेल्या पोलिसांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. दारूच्या व्यसनापायी अनेक भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले, पण त्याविरोधात पोलिसांनी दंडुका कधी उचलल्याचे हिंगोलीकरांना आठवत नाही. कळमनुरी तालुक्यातील अनेक गावातील महिलांनी दारू, मटका, जुगार बंद करण्यात यावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर पदर पसरला, परंतु काहीही उपयोग झाला नाही. अवैध वाळू वाहतूक करणार्या डम्परमुळे कित्येकांचा बळी गेला, परंतु पोलिसांचे लक्ष फक्त वाळूतून मिळणार्या कमाईवरच आहे.
गेली अनेक वर्षे हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे सरेआम चालू आहेत. परंतु भाजपने कधी त्याकडे नजर वाकडी करून पाहिले नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येताच भाजपला अवैध धंदे दिसू लागले. भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांना निवेदन देण्यात आले. अवैध धंदे बंद झाले नाहीत, तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिला.
९२८४००४३३१ या नंबरवर तक्रार करा
हिंगोली जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांबद्दल पोलिसांकडे खडान् खडा माहिती आहे. परंतु मिंधेगिरी नसानसांत भिनल्याने पोलीस कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाहीत. भाजपने निवेदन देताच पोलीस अधीक्षकांनी नागरिकांनीच अवैध धंद्यांची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. ९२८४००४३३१ या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास पोलीस कारवाई करणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
 
             
		





































 
     
    






















