
पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट म्हणजेच जैन बार्ंडगची जमीन गोखले बिल्डरला विकण्याचा आदेश धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी रद्द पेला. त्याचबरोबर विक्रीखत व पावर ऑफ अटर्नी रद्द करून मालमत्ता पुन्हा ट्रस्टकडे परत देण्याचे निर्देश दिले आहेत.
धर्मादाय आयुक्त यांच्या या आदेशामुळे गोखले लँडमार्क्स एलएलपी या डेव्हलपर फर्मशी झालेला व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (टीडीएस वगळून) परत करणे बंधनकारक केले आहे. तसेच संबंधित मालमत्ता ट्रस्टच्या नावावर परत नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर जैन बोर्डिंगमधील जैन मुनी, विद्यार्थी आणि जैन संघटनांनी जल्लोष केला.
गेल्या पाच महिन्यांपासून जैन बोर्डिंगचे जमीन विक्री प्रकरण गाजत होते. भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे बिल्डर मित्र विशाल गोखले यांना ही सुमारे तीन एकर जमीन 230 कोटी रुपयांना विकण्यात आली होती. ट्रस्ट आणि बिल्डरच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचा आरोप होता या प्रश्नावर जैन संघटना, विद्यार्थी संघटना, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पुण्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षदेखील आक्रमक झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या व्यवहारातील संबंधदेखील समोर आला होता.
विद्यार्थ्यांसाठी आणि जैन समाजासाठी उभारलेली ही ऐतिहासिक संस्था काही लोकांनी गैरमार्गाने बिल्डरला विकल्याचा प्रकार समोर आला. हे प्रकरण पुन्हा धर्मदाय आयुक्तांकडे गेले. त्यांनी हा व्यवहार जैसे-थे ठेवण्याचे आदेश दिले. यादरम्यान बिल्डर गोखले यांनी या व्यवहारातून माघार घेत असल्याचे पत्र दिले. आज या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. त्यावर धर्मादाय आयुक्त यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आचार्य गुरुदेव गुप्तिनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनात, या लढय़ात अॅड. योगेश पांडे, अण्णा पाटील, चंद्रकांत पाटील, सुकाwशल जिंतूरकर यांनी कायदेशीर बाजू सांभाळली आणि सुनावणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
या गैरव्यवहाराचा मुद्दा सर्वप्रथम अक्षय जैन, आनंद कांकरिया, स्वप्नील गंगवाल, महावीर चौगुले यांनी सुरुवातीपासून पुरावे गोळा करणे, दस्तऐवज गोळा करणे यामध्ये पुढाकार घेतला.
या प्रकरणातील वकील योगेश पांडे म्हणाले, सर्व कायदेशीरबाबी तपासून, दिवस-रात्र एक करून हा लढा आम्ही ताकदीने जिंकलो आणि यापुढेही लढा सुरू राहील. उच्च न्यायालय धर्मादाय आयुक्त यांच्यापुढे दाद मागायचा निर्धार होता. लढा यशस्वी झाला याचा आनंद आहे, असे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.
जैन समाज अहिंसेच्या मार्गाने चालत आलेला आहे, या लढय़ाला यश आलेले आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला सहकार्य केले. जैन हॉस्टेल बचाव समितीचे अक्षय म्हणाले, ही केवळ एका मालमत्तेची, जैन समाजाची लढाई नव्हती. ती विद्यार्थ्यांच्या हक्कांची, समाजाच्या श्रद्धेची आणि न्यायाच्या तत्त्वांची सामाजिक लढाई होती. लढाईमुळे सोपी नव्हती, बऱयाच अडचणी आल्यात. सर्वांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी झालो.
आदेशातील मुख्य मुद्दे
ट्रस्टला दिलेला जमीन विक्री मंजुरीचा आदेश रद्द.
8 ऑक्टोबर रोजीची विक्रीखत आणि पावर ऑफ अटर्नी रद्द करण्याचे आदेश.
ट्रस्टने विक्रीतून मिळालेली रक्कम (टीडीएस) परत करणे बंधनकारक.
मालमत्ता पुन्हा ट्रस्टच्या नावावर नोंदविण्याचे निर्देश.
दोन्ही अर्ज निकाली काढण्यात आले.
जैन बांधवांनी या व्यवहारात माझं नाव घेतलं नाही – मुरलीधर मोहोळ
आजच्या सुनावणीत हा जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करण्यात आला आहे. जैन बांधवांनी या व्यवहारात आधी कुठंही माझं नाव घेतलं नाही. त्यानंतर सुनावणीतही माझं काहीच नाव घेण्यात आलं नाही. तरीही माझ्यावर आरोप – प्रत्यारोप झाले. आता पुढे मी एकदा या व्यवहाराशी निगडित लोकांशी संवाद साधणार आहे. जैन बांधवांना न्याय मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
 
             
		





































 
     
    





















