
निवडणूक मतदार यादीतील घोळ, दुबार नावे, सुलभ शौचालय ते आयुक्तांच्या बंगल्यात कोंबलेले बोगस मतदार आणि याबाबत निवडणूक आयोगाची लपवाछपवी याविरुद्ध विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध 1 नोव्हेंबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार आहेत. या मोर्चाची तयारी सुरू असतानाच पनवेल मतदारसंघातील मतदार यातीतील एक फोटो व्हायरल झाला आहे. यात महिलेचे आणि तिच्या पतीचे नाव अजब पद्धतीने लिहिण्यात आले असून कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही.
विधानसभा निवडणुकीत भाजपला राक्षसी बहुमत मिळवून देणारा निवडणूक घोटाळा सध्या रडारवर आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाराष्ट्राची निवडणूक चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही मतदार यादीतील घोळाचा पर्दाफाश केला होता. वरळी मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारीच आदित्य ठाकरे यांनी समोर आणली होती. आता पनवेलमध्येही तसाच प्रकार समोर आला आहे.
पनवेल मतदारसंघातील मतदार यादीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादी भाग क्र 390 मधील हा फोटो असून यात एका महिलेचे नाव रर हह आणि तिच्या पतीचे नाव कक दद असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ही महिला नक्की कोण? असा प्रश्न पडला आहे.
नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर 127 मतदारांची नोंदणी!
दरम्यान, पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल ८५ हजार २११ दुबार दारा शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केल्यानंतर आता खोपोलीतील मतचोरीचाही भंडाफोड झाला. खोपोलीतील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक १० या एका छोट्याशा प्रभागात तब्बल १४० दुबार मतदार असल्याची धक्कादायक बाब आम आदमी पार्टीने उघडकीस आणली. आपने त्या १४० दुबार मतदारांची मतदार यादीच प्रसारमाध्यमांसमोर आणली. इतकेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांत मृत झालेल्या आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावेही यादीतून का वगळण्यात आली नाहीत, असा सवालही केला.
 
             
		





































 
     
    





















