
तिहार कारागृहातील खंडणी रॅकेटचा तपास करून यामध्ये सहभागी तुरुंग अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिल्ली सरकारला दिले. तिहार जेलमध्ये कैद्यांच्या मदतीने आणि जेल अधिकाऱ्यांच्या संगनमताने वसुली रॅकेट सुरू असल्याबद्दल दाखल याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारच्या दक्षता विभागाला दोन आठवड्यांच्या आत तपास अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. तपास अधिकारी नेमून, आरोपपत्र तयार करून अनुमोदन घेणे आणि निष्कर्ष काढण्यासारखी औपचारिकता या अल्पावधीत पूर्ण करावी, असे हायकोर्टाने म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जानेवारी 2026 रोजी होईल.































































