
सरकारने अधिकृतरीत्या इलेक्ट्रॉनिक पासपोर्टला (ई-पासपोर्ट) सुरुवात केली आहे. ई-पासपोर्ट अधिक सुरक्षित आणि इमिग्रेशन प्रक्रिया जलद करणारा असेल. सुरुवातीला ई-पासपोर्ट सुविधा केवळ पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र येथे उपलब्ध होईल. तुमच्या स्थानिक पासपोर्ट सेवा केंद्रात ही सुविधा आहे का, हे आधी जाणून घ्या मगच ई-पासपोर्टसाठी अर्ज करा. नव्या पासपोर्टसाठी अर्ज करणारे आणि जुना पासपोर्ट रिन्यू करणारे असे दोन्ही ई-पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.
ई-पासपोर्ट कसा ओळखाल?
ई-पासपोर्ट दिसायला आपल्या सध्याच्या पासपोर्टसारखाच आहे, पण त्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.
चिप ः या पासपोर्टच्या कव्हरमध्ये एक रेडीओ फ्रेक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चिप आणि एक अॅन्टेना बसवलेला आहे.
बायोमेट्रिक माहिती ः या चिपमध्ये तुमच्या बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) आणि डिजिटल फोटो यांसारखी बायोमेट्रिक माहिती सुरक्षित असते.
सुरक्षितता ः या माहितीमुळे पासपोर्टची नक्कल करणे किंवा त्यात बदल करणे जवळ जवळ अशक्य होते.
नवीन ओळख ः ई-पासपोर्टवर ‘Passport’ या शब्दाच्या खाली एक सोन्याच्या रंगाचे छोटे चिन्ह असते, ज्यामुळे तो लगेच ओळखता येतो.
आंतरराष्ट्रीय मान्यता ः सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे तयार करण्यात आला आहे, त्यामुळे त्याला जगभरात मान्यता आहे.

























































