कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने आम्हाला सहा महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यासाठीचा वेळ आम्ही त्यांना दिला आहे; पण आमचे आंदोलन थांबणार नाही. शेतकरी कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय सरकारला सोडणार नाही, असा इशारा ‘प्रहार’ संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज दिला.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत, शेतमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात विदर्भासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी आक्रमक भूमिका घेत नागपूरमध्ये रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांच्या या महाएल्गार आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेत महायुती सरकारने नरमाईचे धोरण अंगिकारत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करून जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर बच्चू कडू गुरुवारी दुपारी नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी, कर्जमाफीच्या निर्णयासाठी सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे. याचा अर्थ आमचे आंदोलन थांबलेले नाही.

दिलेल्या मुदतीत कर्जमाफी न झाल्यास सरकारला सळो की पळो करू असा इशारा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे बैठकीदरम्यान सांगितले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही दरोडा टाका, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे. कटकारस्थान केल्यास कोणालाही सोडणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

आम्ही कर्जमाफीचे बोललो नाही असे अजित पवारांनी म्हटले. तर 5 वर्षांमध्ये कधीतरी कर्जमाफी करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते. आता त्यांना आम्ही तारखेपर्यंत आणले.

बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह सुमारे 2000 आंदोलकांवर गुन्हे दाखल

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या महाएल्गार आंदोलनासाठी कापूस संशोधन केंद्राच्या शेजारचे मैदान आरक्षित केले असतानाही आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे सलग 24 तास नागपूर-हैदराबाद महामार्ग जाम होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. या प्रकरणी पोलिसांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी आमदार वामनराव चटप, रविकांत तुपकर यांच्यासह सुमारे 2000 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

तारखेपासून पळणाऱ्या सरकारला तारखेवर आणले

शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी दिली जाईल असे सरकार म्हणत होते, ती योग्य वेळ 2028 आणि 2029 मध्ये असू शकली असती ती वेळ जून 2026 हे सर्व शेतकरी नेत्यांनी एकत्र येत आणली. तारखेपासून पडणाऱ्या सरकारला तारखेवर आणले हे आमच्या आंदोलनाचे सर्वांत मोठे यश आहे, असे बच्चू कडू म्हणाले.