
महापालिका वॉर्डांची रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होईल तर 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबईसह सर्व महानगरपालिकांसाठी मतदान घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होतील, असे सूत्रांनी सांगितले.
नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका 15 ते 20 जानेवारीच्या 2026 आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 ची मुदत दिली आहे. निवडणुकीदरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरणे उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी दहा दिवस अगोदर पार पाडल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिषदेला हजर राहणार आहेत. त्यामुळे 20 जानेवारीपूर्वी महापालिका निवडणुका होतील, असेही सांगण्यात आले.
50 हजार ईव्हीएम खरेदी करणार
राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी ईव्हीएम कमी पडू नयेत यासाठी राज्य आयोगाने मशीन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून 50 हजार ईव्हीएम खरेदी केली आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाकडेसुद्धा ईव्हीएमची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हाती घेतली जाईल. कारण तिन्ही टप्प्यांतील निवडणुकीची एकत्र मतमोजणी शक्य नाही. निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल, असे सूत्रांनी सांगितले.
निवडणुका येथे होणार
महापालिका – 29
नगरपालिका – 246
नगर पंचायती – 42
जिल्हा परिषद – 32
पंचायत समिती – 336




























































