
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. असत्याविरोधात सत्याचा आवाजच यावेळी घुमणार असून या धडक मोर्चाला लाखोंची गर्दी उसळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही वापरल्या जाणार आहेत, मात्र तत्पूर्वीच विरोधी पक्षांनी वज्रमूठ एकवटत त्या याद्यांमधील घोळ पुराव्यासह समोर आणले आहेत. मतदार यादीमध्ये लाखो बोगस आणि दुबार नावे आढळली आहेत. सत्ताधारी पक्ष मतचोरी करून निवडणुकीत फायदा घेत आहेत असा विरोधी पक्षांचा दावा आहे. मतदार याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतरही काहीच ठोस कारवाई आयोगाकडून झालेली नाही. त्याचा निषेध या मोर्चाद्वारे नोंदवला जाणार आहे.
मोर्चापूर्वी थेट व्यासपीठाकडे जाऊ नका
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणीही मोर्चाच्या आधी थेट व्यासपीठाकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी. स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
संतापाने मुठी वळणारा टीझर जारी
शिवसेनेने या मोर्चासंदर्भात टीझर जारी केला. हा मोर्चा नेमका कशासाठी असणार याचे आशयपूर्ण कथन त्यात करण्यात आले आहे. निर्धार मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील चुका सुधरवा नाहीतर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हा सर्वांना मिळून ठरवावे लागेल, असा इशारा निवडणूक आयोगाला दिला होता. त्याचा संदर्भ या टीझरमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय ‘लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतं. आताची परिस्थिती अशी आहे की सरकार मतदार निवडू लागलं आहे. लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला आम्ही मतदान करू देणार नाही. नाही म्हणजे नाही! मग काय वाटेल ते होऊदेत,’ अशा उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानेही टीझर अधिक प्रभावी झाला आहे.
विशेष सूचना
- अन्य कोणत्याही स्थानकावर उतरू नये ही विनंती.
- पश्चिम उपनगरातून वाहनाने कोस्टल रोडने येणाऱ्यांनी मरीन लाईन्स चर्चगेटमार्गे हुतात्मा चौक येथे उतरून फॅशन स्ट्रीट येथे पोहोचावे.
- दक्षिण वा मध्य मुंबईतून जे कोस्टल रोडने येणार नाहीत त्यांनी आपली वाहने गिरगाव चौपाटीला डाव्या बाजूस वळवून अथवा महालक्ष्मी मंदिर, जसलोक हॉस्पिटलमार्गे, ऑपेरा हाऊस थिएटर शेजारून, सैफी हॉस्पिटल, महर्षी कर्वे रोडने आयकर भवन येथे उतरून अथवा चर्चगेट स्टेशन येथे सिग्नलला डाव्या बाजूस वळून हुतात्मा चौकात उतरून फॅशन स्ट्रीटवर यावे.
मोर्चाला येणाऱ्यांसाठी सूचना
- पूर्व उपनगरातून वाहनाने वा मध्य रेल्वेने येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर रस्ता पार करून आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि मुंबई (बॉम्बे) जिमखाना दरम्यानच्या पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्यांनी वरीलप्रमाणे अथवा जर फ्री वेने आलात तर पी. डिमेलो रोड ने जीपीओजवळ उतरून चालत वरील मार्गाने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांनी चर्चगेट स्टेशनवर उतरावे, आयकर भवनच्या (सरस्वती रोड, महात्मा गांधी रोड) गल्लीतून मुंबई (बॉम्बे) रुग्णालयाच्या रस्त्याने चालत फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. अथवा पुढे चर्चगेट स्थानकासमोरील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोरील सिग्नलकडून डाव्या बाजूला वळून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून मेट्रोने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्थानकावर उतरावे. तेथून फॅशन स्ट्रीटवर यावे.
मोर्चाआधी जबरदस्त टीझर
शिवसेनेने मोर्चासाठी जबरदस्त टीझर जारी केला आहे. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी… बोगस मतदारांचा पर्दाफाश करण्यासाठी… निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी… लोकशाही आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी… अशी हाक त्यातून देण्यात आली आहे.
मार्गदर्शक सूचनांसाठी क्यूआर कोड स्कॅन करा
मोर्चाला मुंबईसह राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना हा क्यूआर कोड स्कॅन करून जाणून घेता येणार आहेत.
मोर्चा कुठून…
चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीट येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. तिथे सर्वांनी एक वाजेपर्यंत जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लाखोंची गर्दी उसळणार असल्याने तिथे आधीपासूनच आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
किती वाजता
फॅशन स्ट्रीट येथून दुपारी 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. मेट्रो सिनेमामार्गे मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयासमोर येईल. तिथे सर्व प्रमुख नेते मोर्चाला मार्गदर्शन करतील. सायंकाळी 4 वाजता मोर्चाची सांगता होईल.




























































