
केईएम इस्पितळात कार्यरत असलेल्या एका 26 वर्षीय डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या तिघा आरोपींना भोईवाडा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. दोघे आरोपी अटक टाळण्यासाठी पळून जात होते, मात्र पोलीस पथकाने पाठलाग करून आरोपींना पकडले.
डॉ. विशाल यादव (26) हे केईएम इस्पितळातील सीव्हीटीएस विभागात हाऊस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याच विभागात त्यांच्यासोबत मुनज्जा खान (23) ही कार्यरत आहे. एकाच विभागात कामाला असल्याने मुनज्जा आणि विशाल यांच्यात चांगली मैत्री झाली. गेल्या आठवडय़ात मुनज्जाच्या बहिणीला दोघांच्या रिलेशनशिपबद्दल माहीत झाले.
बुधवारी सकाळी ते वॉर्ड क्रमांक 31 मध्ये काम करीत असताना मुनज्जाचा भाऊ फरिद, त्याचा मित्र नाबील आणि आणखी एक तरुण तेथे गेले. त्यांनी डॉ. विशाल यांना बोलायचे असल्याचे सांगत मग इस्पितळाजवळील हनुमान मंदिरासमोर विशाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करून तिघे पसार झाले होते.





























































