पुण्यात गँगवॉरचा पुन्हा भडका! गुंडाच्या भावावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार

शहरातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाला आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौक परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. खून झालेला तरुण हा वनराज आंदेकर खून प्रकरणात अटक असलेल्या आरोपीचा भाऊ आहे. या घटनेने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे.

गणेश काळे (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. समीर काळे याने वनराज खून प्रकरणात पिस्तूल पुरविले होते. तेव्हापासून समीर कारागृहात आहे. त्यामुळे या हत्येमागे बदला घेण्याच्या हेतूने केलेले टोळीयुद्ध असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे रिक्षाचालक म्हणून काम करतो. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

आरोपीच्या शोधासाठी 10 पथके

भरदुपारी तरुणावर फायरिंग करून आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू असून, शोधासाठी 10 पथके रवाना करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-5चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

भरदुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-5चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काळे याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होताना हल्लेखोरांची एक दुचाकी तेथेच असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे.