IND W vs SA W Final – अंतिम सामन्यावर पावसाचे सावट; नवी मुंबईच्या आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी, जोरदार पावसाला सुरुवात

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम वर महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असून नवी मुंबई जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईच्या आकाशामध्ये काळया कुट्ट ढगांची गर्दी झाली असून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे मैदान कव्हरने झाकण्यात आले आहे.

पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत पहिल्यांदा फायनल गाठली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानने 7 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्यांदा फायनल गाठली. आज हा अंतिम सामना रंगणार होता पण पावसानेच स्टेडियमवर बॅटिंग करायला सुरुवात केली आहे.

आयसीसीच्या नियमानुसार आज हा सामना किमान 20-20 षटकांचाही खेळ शक्य झाला नाही तर हा सामना 3 नोव्हेंबर या रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.

दुसरा पर्याय 

3 नोव्हेंबर रोजीही पावसाची शक्यता 55 टक्के असून त्या दिवशीही किमान 20-20 षटकांचा खेळ झाला नाही तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेते घोषित केले जाईल. 2002 मध्येही आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीही हिंदुस्थान आणि श्रीलंकेला संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आले होते.

धावांचा यशस्वी पाठलाग

दरम्यान, सेमीफायनल लढतीमध्ये हिंदुस्थानने 339 धावांचा यशस्वी पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. जेमिमा रॉड्रिग्ज हिने नाबाद 127 धावांची शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही तिला अर्धशतकीय (89) खेळी करत उत्तम साथ दिली.