
राहुरी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या 26 कार्यकर्त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2010 साली ऊस दरवाढीच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्या विरोधात दाखल झालेले खटले न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
12 डिसेंबर 2010 रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुरी येथे मुळा नदीच्या पुलावर नगर–मनमाड रोडवर तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ऊसाला पहिली उचल 2100 रुपये प्रति टन मिळावी, या मागणीसाठी आंदोलन शांततेत पार पडले होते. मात्र काही साखर कारखानदारांनी पोलिसांचा वापर करून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला होता. या प्रकरणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तब्बल 15 वर्षे न्यायालयात हजर राहत राहुरी न्यायालयात 12 वर्षे आणि जिल्हा न्यायालयात 3वर्षे खटला लढवत होते. हे प्रकरण ऍड. मोहनराव धोंडीराम पवार आणि त्यांचे सुपुत्र ऍड. वैभव पवार यांनी विनामूल्य चालवले.
30 ऑक्टोबर 2025 रोजी नगर जिल्हा प्रथम श्रेणी न्यायमूर्ती मोरे यांनी या खटल्यात सर्व 26 आंदोलकांची निर्दोष मुक्तता घोषित केली. उर्वरित काही आंदोलकांच्या खटल्यांचा निकाल प्रलंबित आहे. निर्णयानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऍड. वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा ऊस उत्पादक आंदोलन प्रमुख दिलीप इंगळे यांनी म्हटले की, “हा निकाल खऱ्या अर्थाने न्यायाचा विजय आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना हा मोठा धडा ठरेल.” कार्यकर्त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीची लढाई पुढेही सुरूच राहील.



























































