
1978 सालापासून सुरू झालेलं स्वप्न अखेर 47 वर्षांच्या दीर्घप्रतीक्षेनंतर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या रणरागिणींनी साकारलं. डी.वाय. पाटील स्टेडियम फटाक्यांनी नव्हे तर इतिहासाने उजळले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे नवे जगज्जेते होण्याचा इतिहास रचला आणि हिंदुस्थानी महिला क्रिकेटचं सुवर्णयुग सुरू झाल्याचा शंखनाद केला.
शेफाली वर्माने आजच्या इतिहासाचे सुवर्ण पान आपल्या झंझावाती फलंदाजी आणि तितक्याच भन्नाट गोलंदाजीने लिहिले. पाया वर्माने रचला तर त्यावर जगज्जेतेपदाचा कळस दिप्ती शर्माच्या फिरकीने चढवला. 58 धावांची जबरदस्त खेळी करणाऱ्या दिप्तीने 39 धावांत 5 विकेट घेत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकन समोर उभारलेले 299 धावांचे आव्हान आधी डोंगराएवढे भासत होते, पण कर्णधार लॉरा वुल्फार्ट खेळपट्टीवर पाय रोवून उभी राहिली आणि लक्ष्याचा पाठलाग करताना केलेल्या शतकी मॅरेथॉन खेळीने हिंदुस्थानी संघापुढे अंधारी आणली होती. टॅझमिन ब्रिट्ससोबतची 51 धावांची सलामी आफ्रिकेसाठी स्फूर्तीदायक होती. पण त्यानंतर लॉराच्या साथीला कुणीच उभी राहिली नाही. ती एकटीच लढत होती. फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर शेफालीने गोलंदाजीतही धम्माल केली. तिने आपल्या सलग षटकांत सुन लूस आणि मॅरिझेन केप यांची विकेट घेत आफ्रिकेची 4 बाद 123 अशी अवस्था केली. या कामगिरीमुळे हिंदुस्थानी संघ विजयाच्या ट्रकवर पोहोचला होता.
लॉरा– डर्कसनने ठोके चुकवले
148 धावांत अर्धा संघ गारद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघ बॅकफूटवर पडला होता. तेव्हा कर्णधार लॉरा वुल्फार्टच्या साथीला अनेरी डर्कसन उभी राहिली. दोघींनी षटकामागे सात-आठ धावा काढत संघाचा धावफलक दोनशे पलीकडे नेला. या भागीमुळे हिंदुस्थानी संघाचे ठोके वाढले होते. त्यांच्या बॅटीतून निघालेल्या फटक्यांनी हिंदुस्थानी चाहत्यांचे ठोकेही चुकू लागले होते. तेव्हाच दिप्ती शर्माच्या यॉर्करने डर्कसनचा त्रिफळा उदध्वस्त केला आणि तेथेच दक्षिण आफ्रिकेचे जगज्जेतेपदाचे स्वप्नही चक्काचूर झाले. पुढे दिप्तीने एकामागोमाग एक हादरे देत आफ्रिकन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत हिंदुस्थानी संघाला जगज्जेतेपदासमीप नेले आणि नादाईन क्लर्कला बाद करत पहिल्या वहिल्या जगज्जेतेपदावर आपले नावही कोरले. आफ्रिकेच्या शेवटच्या सहापैकी पाच फलंदाज दिप्तीचे बळी ठरले. एक फलंदाज धावचीत झाली. संघाच्या विजयासाठी एकाकी झुंज देत असलेली कर्णधार वुलफार्ट 101 धावांवर बाध झाली. तिची शतकी खेळी अपयशी ठरली. तिने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही 169 धावांची भीमकाय खेळी करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले होते. मात्र आज तिची खेळी त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करु शकली नाही.
संयम, नियंत्रण आणि नंतर हल्ला
फायनल म्हणजे दबाव, प्रेक्षकांचा उत्साह आणि अवघ्या जगाची नजर, पण शेफालीने हे सगळं हसत-हसत झेललं. गेल्या सामन्यात ती अपयशी ठरल्यामुळे तिच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र आज तिने आपले मुख्य रूप जगाला दाखवले. सुरुवातीला तिने नव्या चेंडूला सन्मान दिला, संयमाने खेळली, पण चेंडूवर नजर बसताच तिने आफ्रिकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. तिच्या 12 चौकार आणि 2 षटकारांच्या खेळीने आपण मोठय़ा सामन्यांचे खेळाडू असल्याचेही सिद्ध केले.
स्मृतीसोबतची ‘सुवर्ण जोडी’
हिंदुस्थानच्या विजयाचा पाया रचणाऱ्या या डावाची खरी शोभा वाढवली ती शेफाली आणि स्मृती मानधना यांच्या 98 धावांच्या सुवर्ण भागीदारीने. पहिल्या सात षटकांतच दोघींनी 50 धावा जमवून दक्षिण आफ्रिकेच्या रणनीतीचा फज्जा पाडला. स्मृतीचं सौंदर्य आणि शेफालीची आक्रमकता पाहून डगआऊटमध्ये बसलेले खेळाडूही उभे राहून टाळय़ा वाजवत होते. या भागीदारीने हिंदुस्थानला केवळ चांगली सुरुवात दिली नाही तर विजयाची पायवाट करून दिली.
या खेळीने शेफालीला महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा सन्मान मिळवून दिला. 2017 मध्ये पूनम राऊतने केलेल्या 86 धावांच्या पुढे ती गेली. तिला फक्त 13 धावा कमी पडल्या. अन्यथा ती वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावणारी पहिली हिंदुस्थानी ठरली असती. आजवर हिंदुस्थानच्या एका फलंदाजाला मग तो पुरुष असो किंवा महिला, अंतिम फेरीत शतकी साज चढवता आलेला नाही. तरीही शेफालाची खेळी कुठल्याही शतकापेक्षा कमी नव्हती.
सर्वांनीच उचलला खारीचा वाटा
एकीकडे शेफालीने फटकेबाजी केली. दुसऱ्या बाजूला सर्वांनी खारीचा वाटा उचलत हिंदुस्थानी फलकाला त्रिशतकाच्या दिशेने पळवले. जेमीमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत काwरला विशीच्या पुढे जाता आले नाही. मात्र आज त्यांची जागा दीप्ती शर्मा आणि रिचा घोषच्या खेळीने भरून काढली. दीप्तीने 58 धावा केल्या तर रिचाने 24 चेंडूंत 2 षटकार आणि 2 चौकार खेचत 34 धावा कुटल्या. या खेळींमुळे हिंदुस्थानला त्रिशतकी टप्पा गाठणे शक्य होते, पण शेवटच्या दोन षटकांत आफ्रिकन गोलंदाजांनी केवळ 12 धावांवरच रोखले. हिंदुस्थानचे धावांचे त्रिशतक दोन धावांनी हुकले.
शेफालीचा धडाकेबाज शो
आज डी. वाय. पाटील स्टेडियमचा रविवार ‘शेफाली… शेफाली…’च्या घोषणांनी दुमदुमला अंतिम सामन्यात शेफाली वर्माने अशी फटक्यांची वीज चमकवली की दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी फक्त त्याच्या प्रकाश पाहिला, दिशा नाही. 78 चेंडूंत 87 धावा आणि त्या धावांमध्ये फक्त रन नव्हते, तर आत्मविश्वास, दडपणावर मात आणि अंतिम सामन्याचं धैर्य मिसळलं होतं. याच शेफाली शोच्या जोरावर हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले होते.
47 वर्षांची प्रतीक्षा संपली…
महिला वर्ल्ड कपचा जन्म 1973 साली झाली. त्यानंतर आतापर्यंत 12 वेळा वर्ल्ड कप खेळला गेला आणि त्यात वर्ल्ड कप आपलीच मक्तेदारी असल्याचे दाखवत ऑस्ट्रेलियाने तो सात वेळा आपल्याकडेच ठेवला. इंग्लंडने चार वेळा जिंकण्याचा पराक्रम केला, तर न्यूझीलंडने 2000 साली पहिल्यांदा त्यावर आपला हक्क गाजवला. म्हणजे आतापर्यंत हे तीनच देश जगज्जेते ठरले होते आणि 25 वर्षांनंतर महिला क्रिकेटला हिंदुस्थानच्या रूपाने नवा जगज्जेता लाभला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने 47 वर्षांच्या संघर्षानंतर महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्याची किमया साधली. हिंदुस्थानी संघाइतकी प्रतीक्षा कुणालाही करावी लागली नाही. इंग्लंडने पहिल्याच स्पर्धेत आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले तर पुढच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन टीम जगज्जेती ठरली. न्यूझीलंडला आपले जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल 27 वर्षे वाट पाहावी लागली होती. 2000 साली त्यांनी आपली जगज्जेतेपदाची स्वप्नपूर्ती केली होती.
हिंदुस्थानला 47 वर्षे आणि दोन अंतिम सामन्यांतील पराभवानंतर हे यश संपादता आले आहे. सर्वप्रथम 2005 साली आपण अंतिम फेरीत पोहोचलो, पण ऑस्ट्रेलियाने आपल्याला चिरडले तर 2017 साली इंग्लंडने आपले स्वप्न धुळीस मिळवले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानच्या मार्गातील मोठे अडथळे दूर झाले आणि हिंदुस्थानी महिलांनी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत
कधी एखादा खेळाडू फक्त सामना जिंकत नाही, तर इतिहास लिहितो आणि तो इतिहासात आता हरमनप्रीत काwरने लिहिला आहे. आतापर्यंत हिंदुस्थान वन डे क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद कपिलदेव आणि महेंद्रसिंग धोनीने पटकावले होते. आता त्या पंक्तीत हरमनप्रीतही बसली आहे.
हिंदुस्थानी संघाला अंतिम फेरी गाठून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हरमनप्रीत कालच बसली होती. त्यात कपिल, गांगुली, मिताली राज, धोनी आणि रोहित शर्मा यांची नावे होती, पण जिंकून देणारी हरमनप्रीत तिसरी कर्णधार ठरलीय आणि महिला क्रिकेटची पहिली जगज्जेती कर्णधार.
हिंदुस्थानी क्रिकेटच्या गौरवकथेतील वेगवेगळे अध्याय आहेत. कपिलदेवने 1983 मध्ये संपूर्ण जगाला दाखवले की, ‘हिंदुस्थानी सिंह’ अंगावर धावून येऊ शकतात. धोनीने 2011 मध्ये हिंदुस्थानची 28 वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. आता हरमनप्रीतने महिला क्रिकेटची 47 वर्षांची प्रतीक्षा मायदेशात संपवत नवा अध्याय लिहिला.



























































