‘थामा’साठी रश्मिका 12 तास शूटिंग करायची, आदित्य सरपोतदारांकडून कामाचे कौतुक

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी रश्मिका मंदाना हिच्या कामाचा उल्लेख करत ती 12 तास शूटिंग करायची असे म्हटले आहे. 12 तास काम करताना तिने कधीही कोणतीही तक्रार केली नाही, असेही म्हटले. यामुळे दीपिका पादूकोण हिने 8 तासांच्या शिफ्टची केलेल्या मागणीवर बॉलीवूडमध्ये अजूनही दोन गट पडलेले दिसत आहेत.

बॉलीवूडमधील काहींनी दीपिकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, तर काहींना हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही एक अभिनेता असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही 12 तास पूर्ण ऊर्जेने काम करू शकता, चांगले दिसू शकता आणि तुमचे 100 टक्के देऊ शकता, तर का नाही? पण जर तुम्हाला वाटत असेल की, 8 तास तुमच्यासाठी योग्य आहेत आणि तुम्ही त्यापेक्षा जास्त करू शकत नाही, तर तेही ठीक आहे. शेवटी ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे, असे आदित्य सरपोतदार म्हणाले.