राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिष्ठा पणाला, न्यूयॉर्क महापौरपदासाठी आज मुख्य मतदान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या, 4 नोव्हेंबरला न्यूयॉर्क महापौरपदासाठी मुख्य मतदान पार पडणार आहे. न्यूयॉर्क शहरातील जनता आपला नवा महापौर निवडतील. या निवडणुकीसोबतच व्हर्जिनिया आणि न्यू जर्सीमध्येही गव्हर्नर व कायदेमंडळाच्या निवडणुका होणार आहेत. ट्रम्प यांच्या निवडीला 5 नोव्हेंबरला बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी घेतलेल्या निर्णयाची जगभरात चर्चा आहे. त्यामुळे अमेरिकेतील अनेकांनी ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली आहे.

न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत जोहरान ममदानी हे आघाडीवर आहेत. ममदानी हे हिंदुस्थानी वंशाचे आहेत. ते अवघ्या 33 वर्षांचे असून न्यूयॉर्क राज्य विधानसभेचे सदस्य आहेत. जोहरान हे युगांडाचे लेखक महमूद ममदानी व चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे सुपुत्र आहेत. त्यांना मतदार, तरुण, आफ्रिकन-अमेरिकन आणि लॅटिनो लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ममदानी सध्या 14 टक्के मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.

ट्रम्प यांनी ममदानी यांना इशारा दिला आहे की, जर ते महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर राष्ट्राध्यक्ष म्हणून ते न्यूयॉर्कला संघीय मदत निधी देणार नाहीत. आतापर्यंत मदत निधी दिला जात होता, परंतु ममदानी निवडून आल्यानंतर हा निधी तत्काळ थांबवला जाईल, असा इशारा निवडणुकीत दिला आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या शर्यतीसोबतच व्हर्जिनिया आणि न्यूजर्सी या दोन डेमोक्रॅटिक राज्यांमध्येही गव्हर्नरपदासाठी स्पर्धा सुरू आहे.

लोकप्रियता घसरली

डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियतासुद्धा घसरली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत ट्रम्प यांची लोकप्रियता 18 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जगातील विविध राष्ट्रांवर लावलेला टॅरिफ, अमेरिकेतील महागाई आणि देशातील इमिग्रेशनवरील त्यांच्या कठोर भूमिकेमुळे मध्यमवर्गीय व शहरी उच्चभ्रू वर्ग ट्रम्प यांच्यापासून दुरावला आहे, असे अनेकांना वाटते. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे आता संपूर्ण अमेरिकेचे लक्ष लागले आहे.