
राज्यभरातील जवळपास 85 हजार एसटी कामगारांना थकबाकी हप्त्याबाबत महायुती सरकारने पुन्हा एकदा गंडवले. ऑक्टोबरच्या पगारासोबत थकबाकीचा हप्ता देण्याऐवजी नोव्हेंबरपासून थकबाकीची रक्कम देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे एसटी कामगारांची दिवाळी गोड करू, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ‘फुसका बार’ ठरली आहे.
एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्यांबाबत महायुती सरकारने टोलवाटोलवी केली. त्याविरोधात एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने आंदोलनाचे शस्त्र उपसले होते. कामगारांच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकले आणि प्रलंबित आर्थिक भत्ते देण्याची तयारी दर्शवली. एसटी कामगारांना दिवाळी भेट म्हणून 6 हजार रुपये देण्याबरोबरच महिन्याच्या पगारासोबत इतर थकीत देयकांचा व वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता दिला जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. एसटी कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी ऑक्टोबरच्या पगारातूनच थकबाकीच्या हप्त्याची रक्कम देणे आवश्यक होते. मात्र सरकारने थकबाकीच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एक महिना पुढे ढकलली. थकबाकीची रक्कम 48 समान हप्त्यांमध्ये नोव्हेंबरच्या पगारापासून अदा केली जाईल, असे एसटी महामंडळाने सोमवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे कामगारांची घोर निराशा झाली आहे. महायुती सरकारच्या ‘गंडवागंडवी’विरोधात राज्यभरातील एसटी कामगारांमध्ये पुन्हा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसटी कामगारांची विविध भत्त्यांची थकबाकी 4 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. कामगारांचे हक्काचे पैसे वेळीच मिळाले पाहिजेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थकबाकीचा हप्ता देऊन कामगारांची दिवाळी गोड करणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्याची अंमलबजावणी एक महिना पुढे ढकलली आहे. त्यामुळे एसटी कामगारांचा अपेक्षाभंग झाला आहे.
हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना
आंदोलनापूर्वीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाळी गोड करू असा शब्द दिला. त्यावेळी 6500 रुपयांच्या फरकाचा हप्ता नोव्हेंबरमध्ये दिल्या जाणाऱया ऑक्टोबरच्या पगारात देण्याचे मान्य केले होते. मंत्र्यांनी तसे मान्य करूनही थकीत भत्त्यांच्या फरकाचा हप्ता एक महिना पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचारीवर्ग नाराज झाला आहे.
संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना


























































