
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना चितपट करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. निवडणुकीच्या प्राथमिक तयारी संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नुकतीच उरण तालुका व शहरामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
नवीन शेवा शिवसेना शाखेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी गावागावात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्या. आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत विरोधकांना चितपट करून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा संकल्पही यावेळी सर्वांनी केला.
बैठकीला उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण संपर्कप्रमुख महादेव घरत यांच्यासह सर्व आजी-माजी तालुकाप्रमुख, तालुका संपर्कप्रमुख, तालुका संघटक, शहरप्रमुख, शहर संपर्कप्रमुख, शहर संघटक, उपतालुकाप्रमुख, उपतालुका संघटक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




























































