
सदोष मतदार याद्यांच्या संदर्भात आम्ही काढलेल्या मोर्चानंतर, काल स्वतः सत्ताधाऱ्यांनीच कबूल केले आहे की या राज्यात दुबार मतदान होत आहे. पण निवडणूक आयोग मात्र यावर काहीही बोलत नाही आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, सत्तेमध्ये असलेले तिन्ही पक्ष कबूल करतायत की याद्यांमध्ये काहीतरी गडबड आहे. एकीकडे भाजप सदोष मतदार याद्यांच्या संदर्भात काढलेल्या मोर्चाला विरोध म्हणून मूक आंदोलन करतंय आणि दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दोष आहे हे कबूलही करतंय यावरून भाजपमध्येच दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत, हे सिद्ध होतंय. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सत्ताधारी पक्ष स्वतःच याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य करत असताना, निवडणूक आयोग या संपूर्ण प्रकरणावर शांत का आहे. या गंभीर आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, कोण जिंकेल कोण हारेल यापेक्षा जे काही व्हावे ते पारदर्शक व्हाव अशी आमची अपेक्षा आहे. दुबार मतदार हे संविधानच्या विरोधात आहे. असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका सशक्त लोकशाहीमध्ये शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला भेटण्यात काय अडचण आहे? मग न्याय मागायचा कुणाकडे? न्याय मागणं हा आमचा मूलभूत अधिकार आहे, आता तोही हिरावून घेणार का ही लोकं ? असेही यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकणाची सखोल चौकशी करावी आणि मगच क्लीन चीट द्यावी. निकाल लागण्यापूर्वी कृपा करुन कोणाल क्लिन चीट देऊ नका अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच, रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.































































