
कधी मैदानावर तलवारीसारखा चमकणारा, कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा मायकल क्लार्क आज एका अशा प्रतिस्पर्ध्यासमोर उभा आहे, ज्याला ना बाऊन्सर आहे, ना सीमारेषा. क्रिकेटच्या रणांगणावर अजेय ठरलेला हा योद्धा आता त्वचेच्या कर्करोगाशी लढतोय आणि ती लढाई फक्त त्याच्या शरीराची नाही, तर आत्म्याची आहे. त्याने नुकतेच आपल्या आजाराची कहाणी उघड करत सर्वांना थरारवून टाकले. त्याचे शब्द साधे होते, पण त्यामागे दडलेली वेदना प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयाला भिडणारी होती,
गेल्या काही वर्षांत माझ्या चेहऱ्यावरून आणि शरीरावरून अनेक वेळा कर्करोगाचे डाग कापून काढावे लागले आहेत. हे युद्ध थांबत नाही, फक्त पुढे सरकतं. त्याच्या या एकाच वाक्याने सगळं सांगितलं, एक योद्धा अजूनही लढतोय, पण आता मैदान गवताचं नाही, तर आयुष्याचं आहे.
2006 मध्ये डॉक्टरांनी प्रथम त्याच्या त्वचेतील बदल ओळखले, आणि तेव्हापासून क्लार्क दर सहा महिन्यांनी डर्मटोलॉजिस्टकडे जात राहिला. पण काळानं त्याच्या चेहऱ्यावर उमटवलेले सातहून अधिक शस्त्रक्रियेचे व्रण आज त्याच्या लढाऊ आत्म्याची खूण बनले आहेत. त्याने पुढे सांगितलं, कल्पना करा, हिंदुस्थानात किंवा ऑस्ट्रेलियात आठ तास सूर्याखाली फील्डिंग करणे… चेहऱ्यावर, कानांवर, बाहूंवर सतत जळणारा सूर्य. त्या किरणांमध्ये क्रिकेट खेळताना आपण आयुष्याचं काहीतरी गमावतो.’
हे वाक्य ऐकून असं वाटलं, जणू सूर्याखाली खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरच्या घामाचे थेंब त्या वेळी वेदनेत बदलले. तो म्हणतोय ते फक्त स्वतःचं दुःख नाही, तर त्या प्रत्येक क्रिकेटपटूचं प्रतिबिंब आहे, जे आयुष्यभर उजेडात खेळले आणि शेवटी त्या उजेडानेच त्यांना जखम दिली. ऑगस्ट 2024 मध्ये क्लार्कनं इन्स्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला. नाकावर टाके, चेहऱ्यावर वेदना… पण डोळ्यांत झळकत होता प्रकाश जागृतीचा, आशेचा. त्याने लिहिलं होतं, ‘स्किन कॅन्सर खरा आहे, विशेषतः ऑस्ट्रेलियात. आज माझ्या नाकातून पुन्हा एक जखम काढण्यात आली. ही पोस्ट प्रत्येकासाठी आहे, आपली त्वचा तपासा. वेळेवर निदान म्हणजे जीवनाचं दुसरं नाव. त्याचा तो फोटो पाहून हजारो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. सोशल मीडियावर ती पोस्ट वाऱ्यासारखी पसरली; पण त्याच्या त्या शब्दांनी फक्त क्लिक नाही, तर अनेकांच्या अंतःकरणाला स्पर्श केला. आज त्याच्या ओठांवर हसू नाही, पण एक संदेश आहे.
‘आपली काळजी घ्या. सूर्याखाली खेळताना मी जे गमावलं ते तुम्ही वाचवा. हे ऐकताना जाणवतं – हा तोच मायकल क्लार्क आहे, जो सिडनीत 329 नाबाद ठोकताना सूर्यालाच आव्हान देत होता. आज तोच सूर्य त्याच्या विरोधात उभा आहे, पण क्लार्क अजूनही झगडतोय, न हरता, न थकता.




























































