
बेस्ट उपक्रमामधून सेवानिवृत्त झालेल्या तब्बल 4500 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसतानाच मंगळवारी एका निवृत्त कर्मचाऱ्याने बेस्टचे मुख्यालय असलेल्या इलेक्ट्रिक हाऊसच्या गेटवर अनोखे आंदोलन केले. आम्ही स्वर्गवासी झाल्यानंतर थकबाकी वर स्वर्गात आणून देणार का, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्याने काळय़ा फलकाद्वारे सरकारला विचारला.
गेल्या तीन वर्षांत बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, कोविड भत्ता, पीएफ तसेच इतर अंतिम देयके रखडवली आहेत. बेस्ट प्रशासनाच्या या असंवेदनशील कारभाराविरोधात मंगळवारी निवृत्त कर्मचारी दीपक जुवाटकर यांनी अनोखे आंदोलन केले. निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी, अंतिम देयके आणि कोविड भत्त्याची थकबाकी बेस्ट कर्मचारी स्वर्गवासी झाल्यानंतर वर आणून देणार का, असा संतप्त सवाल त्यांनी फलकाच्या माध्यमातून सरकार आणि बेस्ट प्रशासनाला विचारला. जुवाटकर हे बेस्ट उपक्रमात तब्बल 32 वर्षे सेवा केल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले. ते मागील दहा महिने अंतिम देयके, कोविड भत्ता व इतर थकबाकीच्या रकमेसाठी वेगवेगळय़ा कार्यालयांत हेलपाटे घालत आहेत.
मंत्रालयाच्या लोकांना लगेच पैसे कसे मिळतात?
माझगाव-कसारा आगारातून निवृत्त झालेल्या दीपक जुवाटकर यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्रालय, पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची निवृत्ती देयके लगेच दिली जातात. आम्हाला पैसे देण्यास चालढकल का केली जातेय? आम्ही बेस्टच्या सेवेत प्रचंड राबलोय. कोविड काळात सेवा दिलीय. असे असताना सरकार दुजाभाव का करतेय? आम्ही कोणते पाप केलेय? आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या, तुमच्याकडे वाढीव काही मागत नाहीय, अशी संतप्त प्रतिक्रिया जुवाटकर यांनी दिली.































































