
जव्हार तालुक्यात 11 हजार 486 जणांना शासकीय घरकुल योजना मंजूर झाली आहे. घरकुल लाभार्थीना जलद, पारदर्शक व डिजिटल पद्धतीने निधी वितरित करण्यासाठी ‘एसएनए स्पर्श’ ही प्रणाली वापरण्याच्या सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून या नव्या पद्धतीत तांत्रिक अडचणी येत असल्याने 6 हजारपेक्षा अधिक लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत.
तालुक्यातील जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त ल ाभार्थ्यांनी पदरमोड व उसनवारी करत घरकुलाचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. गेल्या महिन्यात संबंधित अभियंता यांनी प्रत्यक्ष पाहणी करत फोटो काढून ते संकेतस्थळावर अपलोडही केले. परंतु अद्याप स्पर्श प्रणालीद्वारे अनुदान वितरण झाले नाही. नव्या प्रणालीद्वारे महिनाभरात अनुदान जमा होईल, अशी माहिती गट विकास अधिकारी डी. एस. चित्ते यांनी दिली.
काय आहे नवी पद्धत ?
केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी जलदरीत्या वितरणासाठी ‘एसएनए स्पर्श’चा वापर केला जात आहे. घरकुल अनुदानाचे वितरण आता या नव्या प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. पूर्वी घरकुल लाभार्थीना पीएफएमएसद्वारे अनुदान वितरित केले जात होते. मात्र त्याऐवजी स्पर्श प्रणालीचा वापर करण्याची सूचना शासन स्तरावरून देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत लाभार्थीना अनुदानाचा हप्ता मिळाला नाही.































































