Ratnagiri News – नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपक वापरण्यास बंदी

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार करतात. परंतु त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपक वापरण्यास जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी बंदी घालण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हादंडाधिकारी मनुज जिंदल यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपक वापरावर राज्य निवडणूक आयोगाकडील 4 नोव्हेबर 2025 रोजीच्या आदेशान्वये आचारसंहिता कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध घातल्याबाबतचे आदेश दिले आहेत.
  • ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. रात्री 10 वाजल्यानंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत.
  • कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
  • दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.
  • सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक इसमावर हे आदेश लागू करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन प्रसिध्दी करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.