
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या 23 व्या वर्षी मिळाला होता. त्यांचा हा विक्रम आता मोडण्यात आला आहे. अमेरिकेतील तीन तरुणांनी मेरकॉर या टेक कंपनीची स्थापना केली. याच कंपनीच्या सहसंस्थापक असलेल्या तिघांना त्यांच्या वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षीच जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान मिळाला आहे. या तिघांपैकी दोन तरुण हे हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत, तर एक जण अमेरिकन आहे. आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा हे हिंदुस्थानी वंशाचे आहेत.
मेरकॉर ही अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील एक टेक कंपनी आहे. 2023 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. आदर्श हिरेमठ, सूर्या मिधा आणि ब्रॅण्डन फुडी हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. तिघे शाळेपासूनचे मित्र आहेत. महाविद्यालयीन शिक्षण सोडून कंपनी स्थापन करणाऱ्या ध्येयवेडय़ांना पीटर थील ही फेलोशिप मिळते. मेरकॉर कंपनी सुरू करण्यासाठी तिघांना ही फेलोशिप मिळाली होती. आज त्यांच्या कंपनीचे मूल्य तब्बल 10 अब्ज डॉलर (100 कोटी) इतके असून त्यांच्या कंपनीत 350 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक नुकतीच करण्यात आली आहे.
कंपनीचा सहसंस्थापक आदर्श हिरेमठ म्हणाला, ‘मी जर मेरकॉरसाठी काम सुरू केले नसते तर आज महाविद्यालयातून फक्त पदवी मिळवून बाहेर पडलो असतो. सगळे खूप वेगाने बदलले आहे.’
मेरकॉर कंपनीच्या तिन्ही सहसंस्थापकांकडे कंपनीचे प्रत्येकी 22 टक्के शेअर्स आहेत. हिंदुस्थानातील सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे काम मेरकॉर ही टेक कंपनी करते. ही कंपनी सॉफ्टवेअर अभियंत्यांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीसाठी मुलाखतींचे आयोजन करून देते. एआय रिसर्च लॅब आणि ओपनएआय यांसारख्या कंपन्यांना मेरकॉर ही टेक कंपनी मनुष्यबळ पुरवण्याचे काम करते.


























































