
मुंब्रा अपघात प्रकरणात कनिष्ठ रेल्वे कर्मचाऱयांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या आणि कारवाई थांबवा, अशी आग्रही मागणी करीत रेल कामगार सेनेने गुरुवारी सकाळी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना लेखी निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱयांनी घेतली आणि मागणीला अनुसरुन योग्य ती कार्यवाही करु, असे आश्वासन रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत यांच्या आदेशावरुन, कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या सुचनेनुसार आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची भेट घेतली. यादरम्यान रेल कामगार सेनेने जीआरपीच्या कारवाईचा निषेध केला. तसेच संबंधित कारवाई तत्काळ थांबवण्याची मागणी करीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हिरेश मीना आणि सिनिअर डीईएन (सीओ) पैलास मीना यांना निवेदन देण्यात आले. अशाप्रकारे रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱयांवर कारवाई होणार असेल तर कर्मचारी भीतीच्या वातावरणात व्यवस्थित कार्य करु शकणार नाहीत, याकडे वरिष्ठ अधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळामध्ये संयुक्त सरचिटणीस नरेश बुरघाटे, सहकार्याध्यक्ष योगेश जाधव, सहकार्याध्यक्ष भारत शर्मा, खजिनदार स्वप्नील झेमसे, रनिंग स्टाफ प्रमुख प्रशांत कमानकर, डिव्हिजन सचिव तुकाराम कोरडे, सुशील सोलोमन, सुनील आघाव, विकास पाटील, निलेश पाटील, मिलिंद झिंगे, शैलेश कांबळे, राजा कुट्टी इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.






























































