
रत्नागिरी शहरातील ११४ कोटी ८४ लाख २२ हजार रूपयांच्या रस्त्यांच्या कामात आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन्स कंपनीने ४४ कोटी रूपयांचा डांबर घोटाळा केला आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी आज (11 ऑक्टोबर 2025) पत्रकार परिषदेत केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची ही आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी असून या घोटाळ्याचे सर्व कागदपत्रे आम्ही ईडी, सीबीआय आणि एसीबीला देऊन कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे, बाळ माने यांनी सांगितले.
शिवसेना उपनेते बाळ माने यांनी माहितीच्या अधिकारात रत्नागिरी शहरातील बिटूमिन रस्त्याच्या कामाची माहिती मागितली. त्यामध्ये बिटूमिन रस्त्याची सर्व कामे आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आली आहेत. या कन्स्ट्रक्शन कंपनीने बिटूमिन चलन भरलेली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. ११ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार बिटुमिन चलन सादर करणे आवश्यक आहे. मात्र ते सादर केले नाही. डांबर वापरले असते तर हे चलन सादर करता आले असते. त्यामुळे रस्त्याच्या कामात ४४ कोटी रूपयांचा डांबर घोटाळा झाला असल्याचा खळबळजनक आरोप बाळ माने यांनी केला. आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचे रवींद्र सामंत, स्वरूपा रवींद्र सामंत आणि जया उदय सामंत हे संचालक आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची ही कंपनी आहे. सत्तेचा दबाव टाकून चलन भरलेले नसताना ही बीले काढण्यात आली असल्याचा आरोप बाळ माने यांनी केला. यावेळी मिहिर माने यांनी शहरातील अर्धवट कामाची यादी वाचून दाखवली. यावेळी विराज माने उपस्थित होते.
आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाका
रत्नागिरी शहरातील सर्व रस्त्यांचे तांत्रिक आणि वित्तीय फॉरेन्सिक ऑडिट करा, आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी करा, शहरातील सर्व कामांच्या नोंदी सुरक्षित व डिजीटल करून त्या सील कराव्यात. आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीला काळ्या यादीत टाका. निधीच्या वितरणाचा तपास करून आवश्यक असल्यास मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यातंर्गत चौकशी करा, अशी मागणी बाळ माने यांनी केली.
आम्हाला पोलीस संरक्षण द्या
गेल्या काही दिवसांत एमआयडीसी पासून अनेक प्रकरणांचा मी भांडाफोड केला आहे. आता ४४ कोटींचा डांबर घोटाळा बाहेर काढला आहे. उदय सामंत यांच्या गुन्हेगारी जगतातही ओळखी आहेत. त्यामुळे उद्या माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मला आणि माझ्या कुटूंबियांना पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे.

























































