
पार्थ पवार यांनी ज्या जमिनीचा खरेदी व्यवहार केला त्याची माहिती तीन महिने अगोदरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होती. त्यामुळे पुण्यातील या जमीन घोटाळ्याची जबाबदारी अजितदादा कसे काय टाळू शकतात? त्यांचा राजीनामा का नाही, असा संताप सामान्य जनताही सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून व्यक्त करू लागली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार कालच म्हणाले, कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहाराचा विषय तीन महिन्यांपूर्वी आपल्या कानावर आला होता. त्यावेळीच चुकीच्या गोष्टी मला चालणार नाहीत असं मी सांगितले होते. मग तेव्हाच पार्थ पवार यांना का थांबवले नाही? त्यावेळीच थांबवले असते तर जमीन घोटाळा झालाच नसता. या व्यवहारातील चूक आणि गांभीर्य माहीत असतानाही ते होऊ देणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. याची शिक्षा अजित पवारांना का नाही, असा सवाल जनतेकडून केला जात आहे.
मोहित कंबोजच्या जुहूतील घोटाळय़ाकडे दुर्लक्ष
जुहूतील सफाई कामगारांच्या घरांसाठी राखीव असलेला 48,407 चौ. फूट आकाराचा अत्यंत मोक्याचा 800 कोटी रुपये किंमतीचा भूखंड मोहित कंबोज यांच्या कंपनीला देण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात तक्रार केल्यावरही पुढे काहीच कारवाई झालेली नाही. पार्थ पवार यांचा घोटाळा उघड होताच कंबोज यांच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
महसूलमंत्री असताना फाइल माझ्याकडे आली होती – खडसे
महसूल मंत्री असताना कोरेगाव पार्कातील त्या जमिनीची फाइल माझ्याकडे आली होती. त्यामध्ये जमिनीच्या विक्रीसाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी अनेकांच्या माध्यमातून मला संपर्क करत माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण मी ती फाइल नाकारली होती. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना 2013 मध्ये त्यांच्याकडेदेखील तीच फाइल आलेली होती. तेव्हा त्यांनीही फाइल नाकारली होती, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा
कोरेगाक पार्क येथील जमीन खरेदी—किक्री घोटाळ्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज बावधन पोलिसांनी पाषाण येथील दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा टाकून घटनास्थळाचा पंचनामा केला. नोंदणी झालेली कागदपत्रे गुह्याच्या अनुषंगाने तपासासाठी जप्त केली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.































































