
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हेच माझ्या हत्याकटाचे सुत्रधार असल्याचा गौप्यस्फोट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. भाऊबिजेच्या दिवशी मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यात अडीच कोटींची सुपारी देण्याचे ठरले. खोटे रेकॉर्डिंग, व्हिडीओही बनवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
आंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी हत्याकटाचे धागेदोरे उलगडून सांगितले. छत्रपती संभाजीनगरातील झाल्टा फाटय़ावर अटक करण्यात आलेले दोघे जण आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली. अगोदर खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात यश न आल्यामुळे हत्येचा कट रचण्यात आला. अन्नात विष घालून किंवा औषधगोळय़ा देऊन, अंगावर गाडी घालून मला मारण्यात येणार होते असे जरांगे म्हणाले. या कटात दहा ते बारा जण सामील असल्याचेही त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.
सीबीआय चौकशी करा- धनंजय मुंडे
मनोज जरांगे आणि त्यांच्या टोळीपासून आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला. मनोज जरांगे आणि आपली ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी असेही ते म्हणाले.



























































