
>> प्रिया कांबळे
हैदराबाद मेट्रो प्रकल्पादरम्यान शेकडो झाडे कुठलाही विरोध न होता तोडली जात असताना रामचंद्र यांनी ते पाहिले. मनातला हा कोलाहल प्रश्नांची उत्तरे शोधत होता अन् याचे उत्तर त्यांना मिळाले. झाडे तोडण्याऐवजी स्थलांतरितही करता येतात हे समजताच त्यांनी झाडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. आजपावेतो हैदराबाद मेट्रो प्रकल्पादरम्यान 800 झाडांचे स्थलांतरण झाले आहे.
हैदराबादचे रामचंद्र अप्पारी यांनी इजिप्त तंत्राचा वापर करून 2010 पासून आतापर्यंत दीड लाखाहून अधिक झाडांचे स्थलांतर केले आहे. आपल्या ‘ग्रीन मॉर्निंग हॉर्टिकल्चर सर्व्हिसेस’ या कंपनीद्वारे त्यांनी हे यशस्वी कार्य केले आहे. त्यांच्या कंपनीने अनेक शहरांमध्ये झाडांचे यशस्वी स्थलांतर करून हे सिद्ध केले आहे की, जगात जिथे विकास अनेकदा निसर्गापेक्षा वरचढ ठरतो, तिथे प्रगतीसाठी पर्यावरण संतुलित राखण्यासाठी झाडे कमी करावी लागत नाहीत.
एकदा हैदराबाद मेट्रो प्रकल्पादरम्यान शेकडो झाडे कुठलाही विरोध न होता तोडली जात होती. रामचंद्र यांनी ते पाहिले आणि त्यांनी गप्प न बसण्याचा निर्णय घेतला. एका ऑस्ट्रेलियन मित्राशी बोलताना त्यांना पहिल्यांदा समजले की, झाडे तोडण्याऐवजी स्थलांतरितही करता येतात आणि त्यांनी झाडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हैदराबाद मेट्रो प्रकल्पादरम्यान 800 झाडांचे स्थलांतर केले.
झाडे तोडण्याऐवजी त्यांना नवीन ठिकाणी लावून पर्यावरणाचे रक्षण करणे हा त्यांचा उद्देश बनला आणि ते या कामासाठी सरकारी व खासगी संस्थांसोबत काम करू लागले. त्यांनी जुनी इजिप्शियन पद्धत आणि स्वतच्या शोधांचा वापर करून झाडे स्थलांतरित करण्याची एक प्रक्रिया विकसित केली आहे व या प्रक्रियेचा वापर करून ते झाडांचे स्थलांतर करत आहेत. ही पद्धत झाडे न तोडता एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी हलवते. या प्रक्रियेमध्ये झाडाच्या 80 टक्के फांद्या आणि पाने छाटली जातात. मुळांभोवती खंदक खणला जातो, मुळांवर रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि मग मुळांचा गोळा (रूट बॉल) करून ते सुरक्षितपणे नवीन ठिकाणी हलवले जाते.
रामचंद्र आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत भारतभरात दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, विशाखापट्टणम, विझाग येथे अनेक झाडांचे यशस्वीपणे स्थलांतर केले आहे.
रामचंद्र यांनी कृषीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि कृषी व्यवसायात एमबीए केले आहे, पण जेव्हा त्यांना बँकेत नोकरी मिळाली तेव्हा त्यांचे मन तेथे रमले नाही. आठ वर्षे शेतीचा अभ्यास आणि नंतर वित्त क्षेत्रात नोकरी हे त्यांना योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा विचार केला. अखेर त्यांनी आरामदायक नोकरी सोडली आणि आपली आवड निवडली.
आपल्या कामाविषयी रामचंद्र म्हणतात की, आतापर्यंत कंपनीने 90 वेगवेगळ्या प्रजातींमधील सुमारे 5,000 झाडांचे स्थलांतर केले आहे. सर्व प्रजातींचा जगण्याचा दर सारखा नसतो. वड, पिंपळ आणि गुलमोहर यांसारख्या लेटेक्स-उत्पादक, मऊ-लाकडाच्या झाडांचा जगण्याचा दर 90 टक्के असतो, तर कडुनिंब, चिंच आणि साग यांसारख्या कठीण लाकडाच्या झाडांचा जगण्याचा दर 60-70 टक्के असतो. अनेक व्यक्ती त्यांच्या फार्महाऊसमध्ये झाडे स्थलांतरित करण्याची मागणी करतात.
झाडांचे स्थलांतर करण्याचा खर्च झाडाच्या आकारावर, झाडांची संख्या आणि ते किती अंतरावर स्थलांतरित करायचे आहे यावर अवलंबून असतो. जर झाडांची संख्या जास्त असेल तर शुल्क बरेच कमी होते. शुल्क सुमारे 6,000 रुपयांपासून सुरू होते, परंतु आम्ही एका ऑर्डरसाठी 1.5 लाख रुपयेदेखील आकारले आहेत. नवीन झाडे लावणे महत्त्वाचे असले तरी स्थलांतर करणे ही एक व्यावहारिक आणि व्यवहार्य पद्धत आहे. कारण स्थलांतरित झाडे फक्त चार किंवा पाच वर्षांत पुन्हा वाढतात असे रामचंद्र म्हणतात.


























































