
‘नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या रक्तात आणि विचारांतच द्वेष भरलेला आहे. लोकांमध्ये फूट पाडणे, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करणे एवढेच त्यांना करायचे आहे,’ असा घणाघाती हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी किशनगंजमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. राहुल गांधी हे प्रचारातून मोदी, शहा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. ‘ही लढाई विचारांची आहे. त्यांना समाज तोडायचा आहे आणि मला हिंदुस्थान जोडायचा आहे. माझ्या रक्तातच प्रेम आणि बंधुत्वाचा विचार आहे. हाच त्यांच्या आणि आमच्या विचारांतील फरक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
अमित शहा यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. ‘अमित शहा सर्रास खोटे बोलतात. उद्योग उभे करण्यासाठी बिहारमध्ये जमीन नाही असे ते म्हणतात. पण एका रुपयात एक एकर या हिशेबाने अदानीला बिहारमध्ये जमीन देतात, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.
मोदी गरीबांच्या हाताला स्पर्शही करत नाहीत!
नरेंद्र मोदी हे फक्त अदानी-अंबानी आणि सूटबूटवाल्या लोकांशी बोलतात. शेतकरी, मजूर, तरुणांपर्यंत ते जातच नाहीत. ते गरिबांना स्पर्शही करत नाहीत. त्यांना हात लावत नाहीत, असे राहुल म्हणाले. बिहारच्या तरुणांना रोजगार हवा आहे, अन्न प्रक्रिया केंद्र हवे आहे, हॉस्पिटल हवे आहे. मात्र हे समजून घेण्यासाठी पंतप्रधानांना लोकांशी बोलावे लागेल. पण ते बोलतच नाहीत. मोदींना माझे सांगणे आहे की, लोकांना हात लावू नका, त्यांची गळाभेट घेऊ नका, किमान त्यांच्याशी बोला. जेणेकरून तुम्हाला कळेल की त्यांना काय हवे आहे? असा टोला राहुल यांनी मोदींना हाणला.
बिहारमध्ये प्रचार तोफा थंडावल्या, उद्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान
पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान झाल्यानंतर संपूर्ण देशाच्या नजरा आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा रविवारी सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. मंगळवारी 20 जिह्यांतील 122 जागांसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे.


























































