शिरुरकरांनी लढविली शक्कल, बिबट्यांपासून संरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा!

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागात बिबटय़ाच्या हल्ल्यांमध्ये गेल्या महिनाभरात तीन जणांचा बळी गेला. आता बिबटय़ाच्या दहशतीमुळे संरक्षणासाठी येथील महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळय़ात घालण्याची अनोखी शक्कल लढवली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दोन लहान मुले तर जांबुत येथे एका वृद्ध महिलेचा बिबटय़ाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबटय़ा कधी कुठे येईल याचा नेम नाही. त्यामुळे त्या तालुक्यांच्या गाव वाडीवस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बिबटय़ाच्या दहशतीखाली जगत आहेत. आता संरक्षणासाठी येथील महिलांनी गळ्यात टोकदार खिळ्यांचे पट्टे घलण्याची शक्कल लढविली आहे.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील उषा ढोमे आणि सुनिता ढोमे या महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा स्वसंरक्षण करण्यासाठी घातलाय. शेतात काम करत असताना महिला-पुरुष बसून किंवा वाकून काम करत असतात. याच वेळेस सावज आपल्या पट्ट्यात येत असल्याने बिबटय़ा त्यांच्या मानेवर हल्ला करीत असल्याचे आजपर्यंतच्या हल्ल्यात दिसून आले आहे.

बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो हेच ओळखून टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवलीय. यामुळे काही प्रमाणात संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

आम्ही बिबटय़ाचा हल्ला होताना पाहिलाय. त्या वेळी कुत्र्यानी गळ्यात पट्टा घातला होता. त्या पट्टय़ामुळे कुत्रा वाचला. त्या कुत्र्याने खिळे असणारा पट्टा घातला होता. हेच ओळखून आम्ही संरक्षणासाठी हा पट्टा घातला ज्यामुळे बिबटय़ाला आमच्या मानेवर हल्ला करता येणार नाही आणि आमचे संरक्षण होईल.

सुनिता ढोमे, शेतकरी महिला, पिंपरखेड