मुंबई पोलीस, न्यू हिंद अंतिम फेरीत

अष्टपैलू योगेश पाटीलच्या 57 धावांच्या खेळीच्या जोरावर पी. जे. हिंदू जिमखाना संघावर एका विकेटनी विजय मिळवत मुंबई पोलीस जिमखाना संघाने 78 व्या पोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत त्यांची गाठ न्यू हिंद क्रिकेट क्लबशी पडेल. त्यांनी दुसऱया सामन्यात व्हिक्टरी क्रिकेट क्लबवर 4 विकेट राखून मात केली.

पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ढाल समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर यजमान संघाने 193 धावांचे विजयी लक्ष्य 46.5 षटकांत 9 विकेटच्या बदल्यात पार केले. सलामीवीर रुद्र धांडेने (69 चेंडूंत 41 धावा) एक बाजू लावून धरली तरी पी. जे. हिंदू जिमखानाच्या मोहित अवस्थी, राहुल सावंत आणि मॅक्सवेल स्वामिनाथनने (प्रत्येकी 3 विकेट) ठराविक अंतराने मुंबई पोलीस जिमखाना संघाच्या अन्य फलंदाजांना माघारी धाडले. 5 बाद 92 अशा घसरगुंडीनंतर पोलीस जिमखाना पराभवाच्या छायेत होता. पण आठव्या क्रमांकाच्या अष्टपैलू योगेश पाटीलने 50 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांसह 57 धावांची झटपट खेळी करत मुंबई पोलीस जिमखाना संघाचे आव्हान कायम ठेवले. सचिन यादवने 24 आणि रोहित पोळने 24 धावांची नाबाद खेळी करत विजय सुकर केला. तत्पूर्वी, पी. जे. हिंदू जिमखान्याला 192 धावांत रोखले होते.