झोपेतच काळाचा घाला; घराचं छत कोसळून अख्खं कुटुंब ठार, मृतांमध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश

बिहारची राजधानी पाटणाजवळील दानापूर येथे रविवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

बबलू खान (वय – 32), त्यांची पत्नी रौशन खातून (वय – 30), मोठी मुलगी रुकशार (वय – 12), मुलगा चांद (वय – 10) आणि धाकटी मुलगी (वय – 2) असी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा सर्वजण झोपेत होते.

छत पडल्याचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या लोकांनी बबलूच्या घराकडे धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आणि स्थानिकांनी मातीचा ढिगारा हटवून सर्वांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत सर्वांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त घर इंदिरा आवाज योजनेंतर्गत बनवण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. हे घर खूप जुने आणि जर्जर अवस्थेत होते. रविवारी रात्री घराचे छत कोसळले आणि संपूर्ण कुटुंब त्याखाली गाडले गेले. झोपेतच सर्वांचा करून अंत झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.