तिरुपती मंदिराची 250 कोटींची फसवणूक; कंत्राटदाराने पाच वर्षांत 68 लाख किलो बनावट तूप पुरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपासंदर्भात मोठा फसवणूक घोटाळा उघडकीस आला आहे. सीबीआयच्या तपासात आढळलंय की, उत्तराखंडमधील एका डेअरीने 5 वर्षांत तब्बल 68 लाख किलो तूप पुरवले, ज्याची किंमत सुमारे 250 कोटी रुपये होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या डेअरीने कधीही दूध किंवा लोणी विकतच घेतले नव्हते. हा प्रकार 2019 ते 2024 दरम्यान घडला असून हे तूप पवित्र लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरले जात होते, जे दरवर्षी लाखो भक्त खरेदी करतात.

 केमिकल्स पुरवठादार अजय कुमार सुगंध याला अटक केल्यानंतर एसआयटीने नेल्लोर कोर्टात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या गंभीर बाबींचा खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी उत्तराखंडमधील भगवानपूर येथील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी असून तिचे प्रवर्तक कोमिल जैन आणि विपिन जैन आहेत. सीबीआयच्या तपासात  सिद्ध झाले की, भोले बाबा डेअरीने 2019 ते 2024 या काळात कोठूनही दूध किंवा तुपाचा एक थेंबही खरेदी केला नाही. तरीही त्यांनी बनावट उत्पादन करून टीटीडीला तब्बल 68 लाख किलोग्राम भेसळयुक्त तूप पुरवले. कंपनीने एका डेअरी युनिटच्या नावाखाली संपूर्णपणे बनावट तूप उत्पादन युनिट उभारले होते आणि फसवणूक करण्यासाठी त्यांनी बनावट दूध खरेदी व व्यवहाराचे रेकॉर्ड्स तयार केले होते.  

नाकारलेले तूप पुन्हा पुरवले

 सर्वात गंभीर बाब म्हणजे एकदा तिरुपती देवस्थानने फेटाळलेले भेसळयुक्त तूप त्यांना पुन्हा पुरवण्यात आले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्याच्या कारणावरून टीटीडीने एआर डेअरीने पुरवलेले तुपाचे चार टँकर परत पाठवले होते. मात्र सीबीआयच्या तपासात हे टँकर एआर डेअरी प्लांटमध्ये परत न जाता तिरुपती येथील वैष्णवी डेअरी प्लांटजवळ असलेल्या एका स्थानिक स्टोन क्रशिंग युनिटकडे वळवण्यात आले. ऑगस्ट 2024 मध्ये याच वैष्णवी डेअरीने त्या टँकर्सचे लेबल बदलले आणि तेच तूप पुन्हा देवस्थानला पुरवले.