ओबीसी नेते कळसूत्री बाहुल्या, त्यांच्या नाडय़ा तिसऱ्याच्या हातात! प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांवर निशाणा

ओबीसी नेत्यांच्या नाडय़ा तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे या नेत्यांना नाचवलं जात आहे, असे नमूद करत धर्म नाही तर ओबीसी संकटात आहे. त्यामुळे ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही, अशी भूमिका आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मनोज जरांगे यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यानंतर 190 आमदार त्यांच्या भेटीला गेले. जरांगे यांच्या मागण्या मान्य करा, असे या आमदारांचे थेटपणे सांगणे होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. मुख्यमंत्रीपद जाऊ नये म्हणून त्यांनी 2 सप्टेंबरला जीआर काढला. या जीआरने ओबीसी आरक्षणात घुसखोरी झाली. म्हणूनच ओबीसी मतदारांनी भाजपला अजिबात मतदान करू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

ओबीसींनी भाजपच नाही तर त्यांचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट आणि शिंदे गटालाही मतदान करायचे नाही. तसे गावातील आणि वस्तीवरच्या मतदारांकडून वदवून घ्या, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अतिवृष्टीचे अनुदान जालन्यातल्या एका तरी शेतकऱ्याला मिळाले का? सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली, अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही कलेक्टर किंवा पोलिसांची गाडी पह्डून चालणार नाही, सत्ताधाऱ्यांना दणका द्यावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.