
हिंदुस्थानी शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य हिंदुस्थानी कुस्ती संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रीय कुस्ती संकुल, वडकी (पुणे) येथे पार पडलेल्या ‘हिंद केसरी’ निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत नवी मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त तसेच सलग तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि जागतिक पोलीस सुवर्णपदक विजेता पैलवान विजय चौधरीने दमदार व ऐतिहासिक खेळी करत ‘हिंद केसरी’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
पुढील वर्षी 15 ते 20 जानेवारी 2026 रोजी सातारा जिल्हा येथे होणाऱया ‘हिंद केसरी’ स्पर्धेसाठी चौधरी यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. निवड चाचणीदरम्यान चौधरी यांनी खेळलेल्या प्रेक्षणीय कुस्त्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत चौधरी यांनी चार सलग कुस्त्यांमध्ये विजय मिळवत आगेकूच केली. यावेळी बोलताना चौधरी म्हणाला ‘महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस कर्तव्याबरोबरच खेळात्तसुद्धा महाराष्ट्र पोलिसांचे देशभर नाव उज्ज्वल ठेवणे हा माझा ध्यास आहे व कुस्ती क्षेत्रातील मानाचा ‘हिंद केसरी’ किताब महाराष्ट्र पोलीस दलाच्या नावावर करण्यासाठी मी सर्वस्वाने प्रयत्न करणार आहे.


























































