
कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आता वन डे संघात आपली जागा पक्की करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला खेळ दाखवावाच लागणार आहे. बीसीसीआयने दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला आहे, जर वन डे क्रिकेटमध्ये खेळायचे असेल, तर विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असल्याचे बीसीसीआयने विराट आणि रोहितला कळवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीसीसीआयचा हा स्पष्ट इशारा दोघांपर्यंत पोहोचल्यामुळे आगामी हजारे ट्रॉफीत दोघांचा खेळ क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळणार आह.
बीसीसीआयच्या सूत्रांनुसार संघ व्यवस्थापनाने कोहली आणि रोहितला स्पष्ट सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय वेळापत्रकात मिळणाऱया विश्रांतीच्या काळात त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक असेल. या निर्णयामागचा उद्देश म्हणजे अनुभवी खेळाडूंची
मॅच फिटनेस आणि गेम लय टिकवून ठेवणे, जेणेकरून दीर्घ विश्रांतीनंतर ते थेट आंतरराष्ट्रीय सामन्यांत न उतरता स्पर्धात्मक तयारी करून येतील. विशेषतः 2027 च्या वन डे विश्वचषकाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे की, तो 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱया विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी उपलब्ध असेल. हे पाऊल बीसीसीआयच्या त्या कठोर निर्देशानंतर उचलले गेले आहे. ज्यात वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही तारीख हिंदुस्थानच्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकांदरम्यान येते. म्हणजेच हीच एकमेव वन डे विंडो उपलब्ध आहे. सध्या रोहित मुंबईतील शरद पवार इनडोअर अॅपॅडमीमध्ये सराव करत असून, त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळण्याचे संकेतही दिले आहेत.
विराट कोहली सध्या लंडनमध्ये आहे, मात्र बीसीसीआयला विश्वास आहे की, तो हिंदुस्थानात परतल्यानंतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होईल. मागील हंगामात कोहली आणि रोहितने दोघांनीही रणजी ट्रॉफीत प्रत्येकी एक सामना खेळला होता. कोहली 12 वर्षांनंतर दिल्लीसाठी तर रोहित 10 वर्षांनी मुंबईसाठी खेळला होता. त्यावेळी रोहितने स्पष्ट सांगितले होते की, आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे देशांतर्गत क्रिकेटसाठी वेळ काढणे अवघड जाते, मात्र आता बोर्डाच्या नव्या नियमांमुळे ही परिस्थिती बदलली आहे.

























































