बांग्लादेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, पाच ठिकाणी स्फोट; 17 बस जाळल्या

आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बांग्लादेशातील युनुस सरकारविरुद्ध बंडाचे रणशिंग फुंकले आहे. ढाका लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत 17 बसेस जाळल्या गेल्याची माहिती मिळाली आहे. ढाकामधील 5 ठिकाणी स्फोट झाल्याच्याही बातम्या आहेत. आवामी लीगच्या हिंसक आंदोलनामुळे ढाका आणि मेमनसिंहसारख्या मोठ्या शहरांमध्ये सैन्याची तैनाती करण्यात आली आहे.

गुरुवारी आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम कमालपूर स्टेशन आणि गोपालगंज पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर आग लावली. या आगीत कार्यकर्त्यांनी दोन बसेस जाळल्या.

आज बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पहिला निकाल लागणार आहे. आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना भीती आहे की या निकालात हसीना यांना दोषी ठरवले जाईल, ज्यामुळे त्यांच्या बांग्लादेशात पुनरागमनाची शक्यता अत्यंत कमी होईल.

बांग्लादेश सरकारच्या मते, हसीना यांच्या आदेशावरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला होता. या प्रकरणात हसीना यांच्यासह बांग्लादेशचे माजी गृह मंत्रीही आरोपी आहेत.

याच कारणामुळे आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध बंड पुकारले आहे. इतकेच नव्हे, तर सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या शेख हसीना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी युनुस सरकार अमेरिकेचे प्यादे असल्याचा आरोप केला आहे.

युनुस सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की ही हिंसा हसीना शेख यांच्या सांगण्यावरूनच होत आहे. शेख पुन्हा एकदा बांग्लादेशला अशांततेच्या आगीत ढकलू पाहत आहेत. सरकारने नागरिकांना 13 नोव्हेंबर रोजी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

बांग्लादेश पोलिसांनी हिंसा रोखण्यासाठी गेल्या 24 तासांत आवामी लीगच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलीस या कार्यकर्त्यांना संशयाच्या आधारे ताब्यात घेत आहेत.

बांग्लादेश सरकारच्या माहितीनुसार, आंदोलन दडपण्यासाठी पोलीस आणि सैन्यदलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच गुप्तचर यंत्रणेलाही हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे.