Children’s day 2025 – P&G ‘शिक्षा’ची 20 वर्षे पूर्ण; 50 लाख बालकांचे सबलीकरण अन् गरिमाची यशोगाथा!

P&G इंडियाच्या ‘शिक्षा’ उपक्रमाने आपला २० वा वर्धापनदिन साजरा केला असून, दोन दशकांत ५० लाखांहून अधिक बालकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. या उपक्रमातून लाभलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी मध्य प्रदेशातील सातलापूर गावातील गरिमा मांदलोईने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवून एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. शिक्षेच्या सहाय्याने तिने शाळेत उत्तम इंग्रजी शिक्षण घेतले, ज्यामुळे तिला पुढील शिक्षण आणि JEE परीक्षेची तयारी करताना मोठी मदत मिळाली.

गरिमाच्या आर्थिक अडचणीच्या काळात ‘शिक्षा’ टीम आणि P&G च्या मांडीदीप प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी तिला मदतीचा हात दिला. या सहाय्यामुळे तिचे IIT प्रवेशाचे स्वप्न साकार झाले आणि ती ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली. शिक्षणाने जीवनात किती मोठा बदल घडवू शकतो, याचे गरिमा हे जिवंत उदाहरण आहे.

२००५ मध्ये CSR नियम येण्यापूर्वीच सुरु झालेल्या या उपक्रमाने देशभरातील शिक्षणाची पातळी उंचावण्याचे काम केले आहे. ‘शिक्षा बेटीयाँ शिष्यवृत्ती’सारख्या योजनांमुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली असून, गेल्या वर्षभरात ७०% विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा दिसून आली आहे. गरिमासारख्या यशकथांमधून ‘शिक्षा’ सिद्ध करते की, संधी आणि प्रयत्न एकत्र आले, तर शिक्षण हेच समाजबदलाचे सर्वात शक्तिशाली साधन ठरते.