80 टक्के रहिवाशांनी कागदपत्रे दिली नाहीत, घरावर नंबरही टाकू दिला नाही! धारावीकरांचा अदानीला हिसका

धारावीत पिढ्यानपिड्या राहणाऱ्या रहिवाशांच्या इच्छेनुसार पुनर्वसन होत नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही, अशी ठाम भूमिका एकजुटीने धारावीकरांनी घेतल्याने अदानी कंपनीची कोंडी झाली आहे. धारावीत सवा लाख झोपड्या आहेत. त्यापैकी 1 लाख 15 हजार कुटुंबांनी म्हणजेच सुमारे 80 टक्के रहिवाशांनी आपली घरे आणि झोपड्यांची कागदपत्रे अद्याप अदानी कंपनीस दिलेली नाहीत, सर्वेक्षणाला येणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी घरांवर नंबरही टाकू दिलेले नाहीत.

अदानी कंपनीला धारावीकरांचे अपेक्षित सहकार्य अद्याप मिळालेले नाही. असे असतानाच धारावी बचाव आंदोलनाने धारावी जनजागृती अभियान सुरू केलेले आहे. या अभियनादरम्यान बोलताना आंदोलनातील नेत्यांनी हा दावा केला. पात्र-अपात्र असा भेदभाव न करता धारावीत हा प्रत्येक कुटुंबाला 500 चौरस फुटांचे घर द्या, दुकानाच्या बदल्यात दुकान वा आणि व्यवसायाच्या जागेच्या बदल्यात दुसरी व्यवसायसुलभ जागा द्या अशा मागण्या केल्या. त्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन अदानी कंपनी व सरकारने द्यावे असा त्यांचा आग्रह आहे. तोपर्यंत अदानी कंपनी किंवा महानगरपालिकेला कोणतीही कागदपत्रे रहिवाशांनी देऊ नयेत यासाठी धारावी बचाव आंदोलनाने धारावीच्या गल्लीबोळांमध्ये ही जनजागृती सुरु केली आहे.

या जनजागृती अभियानात ‘आप’ चे एन. आर. पॉल, इशरत खान, आयुब शेख, डॉ. जावीद अहमद खान, रेणुका शिवपुरे, बसपाचे शामलाल, शेकापच्या साम्या बोरडे, सुभाष पाखरे, मुशिरभाई आदिंसह विविध पक्षांचे कार्यकर्ते, झोपडपट्टीवासीय अभियानात सभागी झाले होते. धारावीतील महात्मा गांधी रोड, लक्ष्मी बाग शिवसेना शाखा, मदिना महीद, मच्छी गल्ली, साईनगर आणि संगमनगर, सोशलनगरमध्ये धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.

धारावीकरांना कल्याण, भिवंडी कर्जतला हुसकावण्याचा डाव

जनजागृतीदरम्यान धारावीतील कावले चाळ येथे धारावी बचाव आंदोलनाची सभा झाली. त्या सभेत आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी अदानी कंपनीवर टीका केली. धारावीतील मेघवाडी, आझादनगर, टिळक नगर आदी ठिकाणची पात्र-अपात्र लोकांची यादी अदानी कंपनीने जाहीर केली. त्यात 80 टक्के लोकांना अपात्र केले आहेत. कारण धारावीकरांना कल्याण, भिवंडी, कर्जतला हुसकावण्याचा अदानीचा डाव आहे, असे ते म्हणाले.