
>>संजय कऱ्हाडे
पंडित जसप्रीत बुमराने काल केलेली गोलंदाजी काकड आरतीसारखी होती. त्याच्या हातून सुटणारा चेंडू तशाच तेजोमय ज्योतीसारखा होता अन् वेग होता लवत्या पापणीचा! दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बुमराचा बेमालूम वेग, टप्पा आणि दिशा पार हादरवून गेला. याच दरम्यान सिराज, कुलदीप आणि अक्षरने बाकीची भजनं, स्तोत्रं, प्रार्थना गर्जत आपली पूजा संपन्न केली. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी मात्र ‘ग्यानबा तुकाराम’च्या चालीवर आपापल्या बॅटी म्यान केल्या!
काहीच दिवसांपूर्वी ‘अ’ संघातर्फे खेळताना बडवले गेलेले सिराज अन् कुलदीप तर ‘तो मी नव्हेच’ या आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या अन् पणशीकरांनी अदा केलेल्या भूमिकेत आहेत की काय असाच संभ्रम निर्माण करून गेले!
कोलकात्याची खेळपट्टी तिसऱ्या-चौथ्या डावात फिरकीला डोक्यावर मिरवेल असं गांगुलीदादा म्हणाला होता. दादांचं म्हणणं खेळपट्टीने तिसऱ्या-चौथ्या तासातच सिद्ध केलं! मात्र, बुमरा-सिराजला असल्या गमजा सोसत नाहीत. दोघांनी मिळून सात बळी घेतले. बुमराचे पाच तर सिराजचे दोन. दोघांनीही एका षटकात दोन बळी मिळवण्याचा शिरस्ता पाडलाय असंही वाटून गेलं. त्यात रिकलटन आणि मार्व्रमला बाद करणारे चेंडू स्वप्नवत होते. वेरीने अन् यान्सनला बाद करणारे सिराजचे चेंडू मुसंडी मारल्यासारखे आत घुसले.
खेळपट्टीवर सुरुवातीला असमान उसळी होती आणि ती कमालीची संथसुद्धा होती. संपूर्ण दिवसभरात एकूण पंच्याहत्तर षटकांत केवळ 196 धावा निघाल्या. बळी मात्र अकरा गेले. याच असमंजस अशा मनःस्थितीत यशस्वी बाद झाला. पण तरीही त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठय़ा अपेक्षा असतील. असो, कोलकात्याच्या खेळपट्टीने नाराज केलं एवढं खरं!
डावरा केशव महाराज आणि ऑफ स्पिनर हार्मरने काल आपल्या चातुर्याची थोडीशी कल्पना दिलेली आहेच. ऐंशीच्या आसपास वेगाने टाकलेले त्यांचे चेंडू खेळपट्टीची पकड घेतानाही दिसले. नाट लावणाऱ्या नाऱ्याचं काम मला नाही करायचं, पण हे दोन गोलंदाज मला आपल्या फलंदाजांच्या दृष्टीने अवलक्षणी वाटतायत! पाहूया, आज आपले वीर कशी फलंदाजी करतायत!
आता थोडंसं क्रिकेटवर जिवापाड प्रेम असणाऱ्यांबद्दल. किमान तसा दावा करणाऱ्या चाहत्यांबद्दल. प्रेक्षक क्रिकेटच्या खेळाचे चाहते आहेत की फक्त आपल्याच क्रिकेटपटूंचे चाहते आहेत, असा प्रश्न मला पडलाय. हे केवळ कोलकात्याच्याच नाही, तर संपूर्ण देशभरच्या प्रेक्षकांबद्दल मला म्हणायचंय. आपल्या फलंदाजाने मारलेला चौकार-षटकार आसमान जमिनीवर आणणारा प्रतिसाद ठसवून जातो; पण प्रतिस्पर्ध्यांच्या चौकार-षटकारावर मात्र वाटतं, प्रेक्षकांनी वेफर्स खाऊन हात झटकलेले असावेत. तेच गोलंदाजांच्या बाबतीतही पाहायला मिळतं. हे अजिबात योग्य नाही. आपला संघ नुकताच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करून आला. पण तिथे आपल्या चौकाराला मिळालेला प्रतिसाद फलंदाजाचा, एकूण खेळाचा, खिलाडू वृत्तीचा सन्मान करणारा दिसतो. कुणी एखादा आडमुठा म्हणेल की, परदेशात प्रचंड प्रतिसाद देणारे तिथले हिंदुस्थानीच असतात. पण दोस्तांनो, ते प्रेक्षक विरुद्ध संघाच्या खेळाडूंनासुद्धा तेवढाच प्रतिसाद देतात… आपण आदर्श प्रेक्षक केव्हा बनणार?


















































