
आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर कामिनी कौशल यांनी तब्बल सात दशके बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. एका महान वनस्पती शास्त्रज्ञच्या घरी जन्मलेल्या कामिनी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड. कॉलेजच्या दिवसापासूनच त्या रंगमंचावर काम करत होत्या. 1946 साली ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
कामिनी कौशल यांचा जन्म 16 जानेवारी 1927 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील शिवराम कश्यप लाहोर येथील पंजाब विद्यापीठात वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. लहान वयातच कामिनी यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रोग्रामिंग सुरू केले. त्यानंतर त्यांनी लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पदवी मिळवली. 1946मध्ये चेतन आनंद यांनी त्यांना ‘नीचा नगर’ या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटाने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता आणि ‘पाल्मे डी’ओर’ पुरस्कार जिंकणारा हा एकमेव हिंदुस्थानी चित्रपट राहिला.
दिलीप कुमार यांच्यासोबत केमिस्ट्री गाजली
n कामिनी कौशल यांनी 1948मध्ये बी.एस. सूद यांच्याशी लग्न केले. कामिनी यांच्या मोठय़ा बहिणीचे ते पती होते. त्यांना दोन मुले होती. त्यांच्या बहिणीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि कामिनी कौशल यांनी त्यांच्या मुलांना वाढवण्यासाठी बहिणीच्या पतीशी लग्न केले. ‘शहीद’ चित्रपटात त्या दिलीप कुमार यांच्यासोबत दिसल्या. विवाहित असूनही या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या. भावाच्या विरोधामुळे आणि कुटुंबाच्या नाराजीमुळे कामिनीला हे नाते संपवावे लागले.
गाजलेले चित्रपट
n ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या कामिनी यांनी 1946 ते 1963 या कालावधीत ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदिया के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘झंझर’, ‘आबरू’, ‘बडे सरकार, ‘जेलर’, ‘नाइट क्लब’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या. साठच्या दशकात त्या चरित्र भूमिकांकडे वळल्या. ‘गोदान’, ‘शहीद’, ‘दो रास्ते’, ‘अनहोनी’, ‘प्रेम नगर’, ‘महा चोर’ यांसारख्या चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘कबीर सिंह’ चित्रपटात काम केले होते. आमीरचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.़




















































