
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]
दैनंदिन आयुष्यात स्वच्छतेच्या नावाखाली आपण आपल्या जीवनशैलीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश केला आहे. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी जी उत्पादने आपण वापरतो त्यात अनेक हानीकारक रसायने असतात. आपले शरीर, आपल्या वस्तू, आहार हे सारे स्वच्छ असावे ही जीवनशैली योग्य असावी याकरता स्वच्छ राहणे ही महत्त्वाची सवय आहे. परंतु स्वच्छतेसाठी म्हणून आपण जी उत्पादने वापरतो त्याबाबत आपल्याला अधिक दक्ष राहायला हवे.
कोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली अनेक रासायनिक द्रावणाची फवारणी ही लागलेली सवय. या फवारण्यामुळे दवाखाने, घरातील चांगले फर्नीचर जुने दिसायला लागले, रंग उडून गंज पकडायला लागला, दरवाज्यांच्या मुठी काम करे ना झाल्या. सोडियम हायपोक्लोराइड हे फक्त वैद्यकीय क्षेत्रात माहिती असलेले नाव आता घराघरात पोहोचले. कपडे धुण्याचे एंझाइमवाले साबण, भांडय़ांचे साबण, फिनाईल असे अनेक रासायनिक शत्रू ज्याच्या वापराने अॅलर्जी, त्वचारोग बळावत आहेत. हे घटक वापरानंतर थेट नदीत सोडले जात आहेत. म्हणून सगळ्या नद्यांची आता गटरगंगा होत चालली आहे.
सकाळी उठल्यापासून तोंडात ब्रश घेतो तेव्हापासून रसायनाची सुरुवात होते. आपल्याकडे इतकी अंधश्रद्धा आहे की, चकचकीत आवरणात असणारी प्रत्येक गोष्ट छानच असा प्रत्येकाने ग्रह केला आहे. एक दक्ष ग्राहक म्हणून वरील आवरणावर काय लिहिले आहे हे वाचून त्याप्रमाणे योग्य ते खरेदी करण्याची सवय आपण लावली पाहिजे.
रसायनांचा हा भस्मासुर वाढण्याआधी वेळीच सावधान होण्याची गरज आहे.
एक मध्यमवयीन स्त्राr माझ्याकडे हाताला झालेला त्वचारोग बरा होत नाही म्हणून दाखवायला आली. औषधे, मलमे यांचा ढीग बरोबर आणला होता. प्राथमिक तपासणी करताना लक्षात आले की या महिला सतत पाण्यात काम करतात. सतत घर स्वच्छ करत असतात. याचा अतिरेक होत आहे. त्या स्वच्छतेबाबतच्या ओसीडीची रुग्ण आहेत, हे लक्षात आले. त्यांना योग्य उपचारांसाठी मानसोपचारतज्ञाकडे पाठवले.
आता समाजही थोडाफार प्रमाणात ओसीडी रुग्णासारखा वागू लागला आहे. मात्र यातही स्वच्छता ही घरापुरतीच, बाहेर कचरा कुठेही फेका. हा देखील एक मनोविकार आहे. त्याला कायदा, साम, दाम, दंड, भेद वापरून वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. रसायनांमुळे होणाऱया प्रदूषणापासून सुटका करताना घरापासून आणि वैयक्तिक वापरापासूनच सुरूवात करायला हवी. प्लास्टिकचा अतिरिक्त वापर ही वेगळी समस्या असली तरी प्लॉस्टिकवर रासायनिक घटकांचा लगेच परिणाम होतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोजच्या दिनचर्येत जास्तीत जास्त आयुर्वेदिक घटकांचा वापर केल्यास अॅलर्जीपासून कर्करोगापर्यंत अनेक गंभीर आजारांपासून आपली सुटका होईल.

























































