सोहळा-संस्कृती – विठुरायाची प्रक्षाळपूजा

>> शुभांगी जोशी, [email protected]


कार्तिकी एकादशी नंतर 9 नोव्हेंबर रोजी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजेचा सोहळा पार पडला. आषाढी-कार्तिकी एकादशी यात्राकाळात लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभे असणाऱया विठुरायाचा शिणवटा घालवण्यासाठी केली जाणारी ही प्रक्षाळपूजेची परंपरा म्हणजे विठुरायाला मानवी भावभावनांच्या कोंदणातून पाहण्यासारखे आहे.

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे

अशी आस धरून हजारो भाविक प्रतिवर्षी पंढरपूरला येतात. आषाढी-कार्तिकीत ही भाविकांची संख्या काही लाखांपर्यंत जाऊन पोहोचते. लाखो भाविक व दर्शनाचे तास मात्र दिवसात चोवीसच. मग देवही जास्तीत जास्त भक्तांना दर्शन व्हावे म्हणून कंबर कसतो. एकादशीच्या मुख्य दिवसाच्या आधी देवाचे नवरात्र बसते. म्हणजे देव आपले नित्योपचार व निद्रा यांचा त्याग करून जवळपास चोवीस तास दर्शन देण्यास उभा ठाकतो. मंदिरात गर्भगृहाच्या डाव्या बाजूस देवाचे शेजघर आहे. त्यात असलेला पलंग या दिवसांत काढला जातो. या नऊ दिवसांत देव फक्त सकाळी स्नान करतो व संध्याकाळी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी श्रीचरणी गरम पाणी घालून लिंबू सरबताचा नैवेद्य दाखवतात. क्षार संजीवनीच्या वापरालाही काही शतकांची परंपरा आहे.

हे देवाचे एक प्रकाराचे व्रतच म्हणायला हवे. या देवाच्या जास्तीच्या कामाच्या व्रताची सांगता होते ती प्रक्षाळपूजेने. नऊ दिवस देवाच्या पाठीमागे लोड लावून ठेवतात. देव थकेल म्हणून हा लोड आधारासाठी. पांडुरंग थकतो म्हणून त्याच्याचसाठी ही पूजा. त्याचा ‘शिणवटा काढणे’ म्हणतात. कालच्या रात्री देवाला सुगंधी तेलाने मालीश करतात, आपादमस्तक त्याला तेलाने चोळतात. हे तेल मंदिरात बनवतात. याला उदवलेलं तेल म्हणतात. या रात्री देवाला फक्त पांढरे धोतर नेसवतात.

प्रक्षाळपूजेचा दिवस पंचांग बघून ठरवतात. मुहूर्त काढतात. या दिवशी गावातले सर्व लोक देवाच्या पायाला लिंबू, साखर लावतात. आता मात्र चांदीच्या पादुकांवर पिठी साखर लावायला परवानगी आहे. सकाळी 11 वाजता पहिले पाणी देवाला स्नानाला घेतात. थकलेल्या देवाला गरम पाण्यामुळे आराम मिळतो. हे पाणी देवळात गरम केले जाते. दुपारी 2.30 वाजता महाअभिषेक संपन्न होतो.

‘हरीहरा नाही भेद’ या उक्तीप्रमाणे शंकर व विष्णू यात भेद नाही. म्हणून चारही शाखांचे वैदिक आमंत्रित केले जातात व चौखांबी मंडपात बसून रूद्र म्हटले जातात. देवाला दुधाचा अभिषेक गाईच्या शिंगातून केला जातो. 25 ते 50 लिटर दूध लागते. तोपर्यंत संपूर्ण परिवार देवळांना पण गरम पाण्याने स्नान घातले जाते. यात्रा काळात देऊळ अस्वच्छ होते म्हणून देऊळ पण धुतले जाते. तसेच रुक्मिणीस पण दुधाचा अभिषेक केला जातो. रुक्मिणी पण दमलेलीच असते. मग तिला लिंबूपाण्याने आंघोळ घातली जाते. अंग चुरचुरेल म्हणून परत दुधाचा अभिषेक व केशर पाणी घातले जाते. तिथे पवमान म्हटले जाते.

आता विठ्ठलाला जरीकाठी पोशाख व अलंकार घालतात. दुपारी पाच वाजता नैवेद्य दाखवला जातो. यात पाच पक्वान्न असतात. पुरणपोळी, खीर, श्रीखंड, करंजी, साखरभात, अळूची भाजी, कढी, भजी, बटाटा भाजी, वरणभात, दही, पापड, चटणी, पंचामृत, पुरी. देवावर अवलंबून जेवढे लोक आहेत, म्हणजे जे लोक वारी घालतात, तेवढे सगळे जण हा नैवेद्य पांडुरंगाला दाखवतात.

देवाचे रूप पाहण्यासारखे असते. 7 वाजता संध्याकाळी धुपारती केली जाते त्या वेळेस आटीव केशरयुक्त व बदाम, पिस्ता, काजूयुक्त दुधाचा व पेढय़ाचा नैवेद्य दाखवतात. गावातील भाविक पण हा नैवेद्य दाखवतात.

रात्री शेजारतीनंतर देवाला औषधी वनस्पतींचा वापर करून बनवलेला काढा दिला जातो. हा काढा देवळातच बनवला जातो. मला याची फारच गंमत वाटली. देव थकला आहे. मग त्याचा शिणवटा काढायला नको का? शेजघरातील काढलेला पलंग परत स्वच्छ व चकचकीत करून ठेवला जातो (चांदीचा). गादी, खोळ, पलंगपोस…सर्व काही नवीन घातले जाते. शेजारतीत काढय़ाबरोबर शिरा, डाळ, खोबरं यांचाही नैवेद्य दाखवतात.

आता आरती झाली की, देव सुखनिद्रेसाठी शेजघरात जातात. तिथेच देवाजवळ हा काढा ठेवला जातो रात्रभर. काकडा झाल्यावर हा काढा भाविक प्राशन करतात. शिणवटा काढायचा सोहळाच असतो. पुण्याचे भावीक माळी देवाचा व रुक्मिणीचा गाभारा रात्री फुलांनी सजवतात. जणू इंद्राचा दरबार, स्वर्गाचा भास होतो. मन व डोळे तृप्त होतात.